चिंचवडमध्ये महसूल सेवांचा मेगा कॅम्प उद्या सुरू

Spread the love

Loading

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’मध्ये सातबारा, जात प्रमाणपत्र, अधिवास, आधार दुरुस्तीपासून विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली; नागरिकांना मोठा दिलासा.

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुलै २०२६ ।। शासकीय कार्यालयांच्या उंबरठ्यावर वारंवार हेलपाटे मारणाऱ्या नागरिकांसाठी आता दिलासादायक उपक्रम राबविण्यात येत आहे. महसूल प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान २०२६’ आयोजित करण्यात आले असून, विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बुधवार, २२ जुलै रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन मंगल कार्यालयात हे विशेष शिबिर होणार आहे. नागरिकांना शासकीय सेवांसाठी होणारा वेळ, खर्च आणि त्रास कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली. प्रशासन नागरिकांच्या दारात पोहोचावे आणि सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, हा या अभियानामागील प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या विशेष शिबिरात महसूल विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिवंत सातबारा मोहीम, उत्पन्न, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), नॉन-क्रिमिलेअर, जात प्रमाणपत्र, सातबारा उतारा, फेरफार उतारा, आधार कार्ड दुरुस्ती, वारस नोंद, खरेदी-विक्री नोंदींसह अनेक सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ ज्येष्ठ नागरिक अनुदान योजनेशी संबंधित कामांचाही निपटारा याच शिबिरात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे जाण्याची गरज भासणार नाही.

महसूल सेवांबरोबरच राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचाही या शिबिरात समावेश करण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष सुविधा, कुंभार समाजासाठी पारंपरिक व्यवसाय सवलती, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफी, महिलांची शेतकरी म्हणून नोंदणी व प्रमाणपत्र वितरण, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना तसेच शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करण्यासंबंधीच्या प्रक्रियाही पार पाडल्या जाणार आहेत. तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषित करण्यासंबंधीची कामेही या अभियानातून केली जाणार असल्याने अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चिंचवड मंडलातील चिंचवड, आकुर्डी, पिंपरी वाघेरे, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव तसेच निगडी मंडलातील किवळे, रावेत आणि मामुर्डी परिसरातील खातेदार, नागरिक, विद्यार्थी आणि मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार शंकर जगताप यांनी केले आहे. शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे पोहोचविण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, एका दिवसात अनेक कामे पूर्ण करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *