![]()
महाराष्ट्र 24- दिनांक 21 जुलै- आकुर्डीतील नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर घरात पोहोचलेल्या नागरिकांना अंधाराचेच स्वागत मिळत असेल, तर विकासाच्या गप्पा कितीही रंगवल्या तरी त्यांना उजेड येत नाही. प्रभाग क्रमांक १४ मधील अनेक भागांत सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप वाढत असून, या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही नगरसेवकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर आणि नगरसेविका अरुणा लंगोटे यांनी महावितरणच्या भोसरी विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आकुर्डीतील वीजपुरवठ्याच्या समस्येवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे उपस्थित होते.
मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, विवेकनगर, चिंचवड स्टेशन परिसर, साईबाबा नगर, शुभश्री सोसायटी, ऐश्वर्यम सोसायटी आणि क्रांतीनगर या भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. घरगुती कामांपासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासापर्यंत आणि लघुउद्योगांपासून व्यावसायिक व्यवहारांपर्यंत अनेक क्षेत्रांवर त्याचा परिणाम होत आहे. वाढत्या तक्रारी आणि नागरिकांचा आक्रोश लक्षात घेऊन ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांकडे केली.
बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक कामांसाठी निधीची अडचण असल्याचे सांगितल्यावर नगरसेवकांनी स्पष्ट भूमिका मांडली. निधीअभावी कामे रखडू नयेत, यासाठी आवश्यक कामांचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून द्यावे. त्यानंतर पिंपरीचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या स्थानिक विकास निधीतून आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल. तसेच उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतूनही आवश्यक तरतूद करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
वीजपुरवठ्याचा प्रश्न हा केवळ तांत्रिक नाही, तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला आहे. त्यामुळे निधी, प्रक्रिया किंवा कागदोपत्री अडचणींच्या नावाखाली नागरिकांना अंधारात ठेवू नये. प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली. या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहितीही नगरसेवकांनी दिली.