इमरतीच्या गोडव्यात भेसळीचा कडू धक्का

Spread the love

Loading

FDAच्या धडक कारवाईत प्रसिद्ध हॉटेल सील; अस्वच्छता, वारंवार वापरलेले तेल आणि गंभीर नियमभंग उघड

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै २०२६ ।। राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या धडक मोहिमेचा फटका आता छत्रपती संभाजीनगरातील एका प्रसिद्ध मिठाई व्यावसायिकाला बसला आहे. शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या इमरती आणि जिलेबीसाठी प्रसिद्ध असलेल्या मे. उत्तम उपहार गृह या आस्थापन्यावर एफडीएने कारवाई करत थेट परवाना निलंबित केला आणि संपूर्ण आस्थापना सील केली. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत ही आणखी एक मोठी कारवाई मानली जात आहे. तपासणीदरम्यान समोर आलेल्या त्रुटींनी ग्राहकांच्या आरोग्याशी होत असलेल्या खेळाचे धक्कादायक चित्र उघड केले.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत मिठाई आणि तळलेले पदार्थ तयार करण्यासाठी वारंवार वापरलेले तेल व वनस्पती तूप वापरले जात असल्याचे उघड झाले. समोसे आणि भजी तळण्यासाठी वापरलेल्या तेलाचे टीपीसी (TPC) परीक्षणात बीआर रीडिंग ५८, तर जिलेबी आणि इमरतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती तुपाचे बीआर रीडिंग ३६ आढळले, जे सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे नमूद करण्यात आले. याशिवाय मिठाई तयार करण्याच्या ठिकाणी झुरळांचा वावर, भिंतींवर तेलाचा थर, अस्वच्छ परिसर, ड्रेनेजजवळ उघड्यावर ठेवलेले इडलीचे पीठ, तंबाखूच्या पुड्या आणि भिंतींवरील थुंकीच्या खुणा अशा अनेक गंभीर बाबी तपासणीत समोर आल्या.

तपासणीत आणखी धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित आस्थापन्याकडे रेस्टॉरंटचा परवाना असताना प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर मिठाईचे उत्पादन सुरू होते. त्यासाठी आवश्यक उत्पादक परवाना मात्र घेण्यात आलेला नव्हता. मिठाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या टार्ट्राझीन (Tartrazine) या कृत्रिम रंगाचा योग्य वापर कसा करायचा याची माहिती कामगारांनाच नव्हती. २५ ते ३० कामगारांकडे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र नव्हते, तर कीटकनाशक नियंत्रण (Pest Control) केल्याची कोणतीही नोंद उपलब्ध नव्हती. कचरापेट्या उघड्या अवस्थेत, खिडक्यांना जाळ्या नसणे आणि अन्न तयार करण्याच्या जागेतील स्वच्छतेचा पूर्ण अभाव यामुळे अन्नसुरक्षेच्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.

या सर्व गंभीर त्रुटी लक्षात घेऊन एफडीएने संबंधित आस्थापन्याचा परवाना तात्काळ निलंबित करत व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वापरलेले तेल आणि वनस्पती तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. राज्यभर भेसळ, निकृष्ट अन्नपदार्थ आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळाले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश अन्न व औषध प्रशासनाने या कारवाईतून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *