![]()
२६ दिवसांच्या उपोषणानंतरही प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह; ट्रोलिंगला व्हिडिओद्वारे दिले सडेतोड उत्तर
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै २०२६ ।। Sonam Wangchuk Hunger Strike:उपोषण संपलं, पण वाद संपला नाही. तब्बल २६ दिवसांच्या उपोषणानंतर आंदोलन मागे घेतल्याबद्दल सोशल मीडियावर होत असलेल्या आरोपांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक संतप्त झाले आहेत. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेतलेल्या वांगचुक यांनी नव्या व्हिडिओद्वारे ट्रोलर्सना थेट सुनावले आहे. “२६ दिवस उपाशी राहिल्यानंतरही मला माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का?” असा संतप्त सवाल करत त्यांनी आपल्या आंदोलनावर संशय घेणाऱ्यांवर जोरदार शब्दांत टीका केली. उपोषण हा कोणत्याही सौद्याचा भाग नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी केलेला संघर्ष होता, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
व्हिडिओमध्ये बोलताना वांगचुक यांनी आंदोलनादरम्यान आलेल्या शारीरिक आणि मानसिक संघर्षाचाही उल्लेख केला. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी त्यांना जमिनीवर झोपावे लागले, उपोषणाच्या काळात अनेक संकटांना सामोरे जावे लागले आणि त्यांचे ११ किलो वजन कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. “लडाखच्या कडाक्याच्या थंडीतून दिल्लीच्या प्रखर उन्हात मी आंदोलन केलं. एवढ्यानंतरही माझ्या आंदोलनाच्या पवित्रतेचं चारित्र्य प्रमाणपत्र मला कोणाकडून घ्यायचं?” असा सवाल करत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. आंदोलनामागील उद्देशावर शंका उपस्थित करणे हीच सर्वात मोठी वेदना असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपोषण सोडल्यानंतर कोणाकडून ज्यूस घेतला, कोणाच्या उपस्थितीत आंदोलन संपवलं, सरकारशी काही सौदा झाला का, अशा प्रश्नांचा त्यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. “जर मला सौदा करायचाच असता, तर मी २६ दिवस उपाशी राहिलोच नसतो. सौदे अशा प्रकारे होत नसतात; ते आलिशान खोल्यांमध्ये होतात,” असे स्पष्ट करत त्यांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर कठोर प्रहार केला. कालपासून केवळ द्रव पदार्थ घेत असल्याचे सांगत, स्वतःच्या प्रकृतीपेक्षा आंदोलनाच्या हेतूवर संशय घेतला जाणे अधिक वेदनादायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
https://x.com/Wangchuk66/status/2080705409091039475?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2080705409091039475%7Ctwgr%5Ecd516bf0d38e464d850681bd86b011edc26901d8%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fpolitics%2Fsonam-wangchuk-reacts-to-deal-allegations-after-ending-26-day-fast-he-replies-via-new-video-slams-on-troller-over-hunger-strike-marathi-news-1433032
“धिक्कार आहे अशा मानसिकतेचा आणि अशा देशाचा, जिथे अशा नीच विचारांना खतपाणी घातलं जातं,” अशा शब्दांत वांगचुक यांनी आपला संताप व्यक्त केला. नीट प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील आंदोलन सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी २३ जुलै रोजी संपवले असले, तरी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीचा लढा सुरूच राहील, असा संदेशही त्यांनी दिला. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर नव्याने चर्चा सुरू झाली असून, एका बाजूला त्यांना पाठिंबा देणारे तर दुसऱ्या बाजूला प्रश्न उपस्थित करणारे असे दोन गट स्पष्टपणे दिसून येत आहेत. मात्र, या सर्व वादांच्या केंद्रस्थानी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उभा राहिलेला संघर्ष आणि त्याची विश्वासार्हता हा मुद्दाच कायम राहिला आहे.