महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि . २८ सप्टेंबर – मुंबई – कोरोनामुळे सार्वजनिक वाचनालये बंदच असल्यामुळे सामान्य नागरिक मानसिकरीत्या पुरता हवालदिल झाला आहे. सध्या मुंबई शहरात २९, उपनगरांत ४५, तर ठाणे आणि पालघरमध्ये १४३ सार्वजनिक ग्रंथालये असून अनेक ग्रंथालयांना यावर्षीच्या अनुदानाचा दुसरा टप्पा मंजूर होऊनही मिळालेला नाही. त्यामुळे येथे काम करणाºया हजारो कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थतीत ग्रंथालयांची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी शासनाने ग्रंथालय सुरू कारण्याबाबत योग्य ती मार्गदर्शक तत्त्वे तयार करून ग्रंथालयाची कवाडे खुली करावीत, अशी मागणी वाचक आणि कर्मचाºयांमधून होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात आलेले नैराश्य वाचनातून दूर होऊ शकते. हा एकाकीपणा दूर करून जगण्याची जिद्द देणाºया पुस्तकांना वाचकांपासून दूर ठेवण्यात येत आहे. पुस्तके देवाणघेवाणीतून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. ग्रंथालये सात महिन्यांपासून बंद असल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाला आधी वर्षाचा संपूर्ण खर्च करावा लागतो, नंतर सरकार अनुदान देत असते. पण व्यवहारच बंद असल्याने व्यवस्थापनांपुढे अडचणी आल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ग्रंथालयांतील पुस्तकांचे नुकसान झाले आहे.
पाऊस, वाळवी यामुळे अनेक ठिकाणची ग्रंथसंपदा नष्ट होते की काय अशी परिस्थिती आहे. यातच अनेक ग्रंथालयांना यावर्षीच्या अनुदानाचा दुसरा टप्पा घोषणा होऊनही मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाºयांचे वेतन, ग्रंथ खरेदी-विक्री आणि इतर खर्च कसे भागवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा परिस्थितीत ग्रंथालयांची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करून ग्रंथालये सुरू करायला हवीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.