मोदींचं कौतुक करत शिवसेनेनं टाकला नवा डाव ; मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि . २९ सप्टेंबर – पुणे – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणले तर अशक्य ते शक्य होण्याचा हा कालखंड आहे,’ अशा शब्दांत कौतुक करत, मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा, असं अप्रत्यक्ष आवाहन शिवसेनेनं केलं आहे. ‘मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न घेऊन भाजपच्या नेत्यांनी मोदींचे मन वळवायला हवे,’ असा सल्लाही शिवसेनेनं दिला आहे.

राज्य सरकारनं दिलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कोल्हापूर व सातारा येथील वंशज संभाजीराजे व उदयनराजे आपापल्या परीनं या लढ्याला बळ देत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी भूमिका उदयनराजे यांनी मांडली आहे. तर, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना ठोकून काढा, असे संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. वातावरण स्फोटक बनलेलं असताना आरक्षणाला स्थगिती मिळण्यासाठी विरोधी पक्ष राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोष देत आहे. या सगळ्याच्या अनुषंगानं शिवसेनेनं ‘सामना’तून भूमिका मांडली आहे. उदयनराजे व संभाजीराजेंच्या भूमिकांतून वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. आपापल्या स्वभावानुसार त्यांनी मतं व्यक्त केली आहेत. कोल्हापूर तसेच सातारच्या छत्रपतींनी आता घेतलेल्या भूमिका या मूळच्या शिवसेनेच्याच आहेत. हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडा, अन्याय करणाऱ्यांना ठोकून काढा असे संभाजीराजे म्हणतात. ही भूमिका शिवसेनेचीच आहे, पण या प्रश्नी नक्की कोणाला ठोकायचे याचे उत्तर मिळायला हवे, अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. या प्रश्नावर सरकारला दोष देणाऱ्या विरोधकांचा मात्र शिवसेनेनं समाचार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *