![]()
हजारो सेवादारांचा सहभाग; ४२,७८५ वृक्षांच्या संवर्धनाचीही जबाबदारी
महाराष्ट्र 24 – भोसरी, पुणे, २३ ऑगस्ट २०२६ : पर्यावरण संवर्धनाचा केवळ गजर न करता प्रत्यक्ष कृतीतून हिरवाई फुलविण्याचा निर्धार संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने पुन्हा एकदा अधोरेखित केला. ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ अभियानाच्या सहाव्या टप्प्यात पुणे झोनमधील पाच ठिकाणी तब्बल १०,३०० रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात एक हजाराहून अधिक सेवादार आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
देशभरातील ६५० ठिकाणी एकाच वेळी राबविण्यात आलेल्या या महाअभियानात सुमारे ५.५ लाख रोपांची लागवड झाली. पिंपळगाव-खडकी, भवरापूर, कोरेगाव-मुळ, खुटबाव आणि पाषाण (सुतारवाडी) येथे पुणे झोनअंतर्गत हा उपक्रम पार पडला.
यंदा पिंपळगाव-खडकी येथील ग्रामपंचायत परिसराचा नवीन ‘वननेस वन’ स्थळ म्हणून समावेश करण्यात आला. सुमारे १,५२,४६० चौरस फूट क्षेत्रावर पाच हजार रोपे लावण्यात आली. विशेष म्हणजे, या अभियानाचा भर केवळ रोप लावण्यावर नसून त्यांचे संगोपन करून ती झाडे होईपर्यंत जपण्यावर आहे.
मागील वर्षांत पुणे झोनमध्ये लावण्यात आलेल्या ४२,७८५ वृक्षांचे संवर्धन व देखभाल करण्याचे कामही सेवादारांनी हाती घेतले. या सर्व वृक्षांची शंभर टक्के जिवंतता कायम राहिल्याने सातत्यपूर्ण देखभालीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाने आज देशव्यापी चळवळीचे रूप घेतले आहे. प्रत्येक रोपाची तीन ते पाच वर्षे नियमित देखभाल करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात ही रोपे घनदाट लघुवनांचे रूप घेऊन जैवविविधतेला चालना देतील, स्थानिक परिसंस्थेला बळकटी देतील आणि भावी पिढ्यांसाठी अधिक स्वच्छ, हिरवेगार वातावरण निर्माण करतील.
‘प्रदूषण आत असो किंवा बाहेर, दोन्हीही हानिकारक आहे,’ या विचारातून पर्यावरणासोबतच मानवी चेतनेच्या निर्मळतेचा संदेशही या अभियानातून देण्यात आला.
