![]()
७ वर्षे जुनी’ दारू नेमकी किती जुनी? लेबलवरून ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या न्यायालयाच्या निरीक्षणानंतर कंपनीला बदल करावे लागणार
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ सप्टेंबर २०२६ ।। ‘ओल्ड मॉन्क’ नाव ऐकलं की काहींच्या चेहऱ्यावर आठ्या नाही तर आठवणी उमटतात; पण सध्या या लोकप्रिय रमच्या बाटलीवरच कायद्याचा शिक्का बसला आहे. महाराष्ट्रातील विक्रीबंदीला तातडीने स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने ओल्ड मॉन्कप्रेमींच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच आली आहे. या प्रकरणात FSSAI ने उत्पादनाच्या लेबलिंगवर आणि त्यातील फ्लेवरिंगवर आक्षेप घेतला आहे. विशेषतः ‘7 years old blended’ आणि ‘very old vatted’ या दाव्यांमुळे सामान्य ग्राहकाला संपूर्ण दारू सात वर्षे जुनी असल्याचा समज होऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयात तर बाटलीच जणू आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिली. खंडपीठाने लेबलवरील माहिती बारकाईने तपासली आणि फ्लेवरिंगबाबतची माहिती इतक्या बारीक अक्षरांत का लिहिली आहे, असा सवाल केला. न्यायालयाने कंपनीला ‘७ वर्षे जुनी’ असा दावा ग्राहकांची दिशाभूल करणारा ठरू शकतो, असे सुनावले. दुसरीकडे कंपनीच्या वकिलांनी नियमांनुसार ब्लेंडेड स्पिरिटमध्ये मान्यताप्राप्त फ्लेवरिंग वापरता येते, असा बचाव केला. इतर ब्रँड्सकडूनही अशाच प्रक्रियेचा वापर होत असल्याचा दावा करून ओल्ड मॉन्कलाच लक्ष्य का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
वादाचा खरा पेच मात्र ‘रम’ या नावाभोवती फिरतो आहे. FSSAI च्या म्हणण्यानुसार उत्पादनात प्रामुख्याने न्यूट्रल स्पिरिट असून मॅच्युअर्ड रम स्पिरिटचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हे उत्पादन ‘रम’ म्हणून विकता येईल का, की ‘रम-फ्लेवर्ड स्पिरिट’ म्हणूनच बाजारात आणावे लागेल, हा मूलभूत प्रश्न उपस्थित झाला आहे. कंपनीने मात्र आरोप फेटाळत नियमांचे पालन केल्याचे सांगितले आहे. दरम्यान, वाद मिटवण्यासाठी ‘7 years old blended’ हा उल्लेख हटवण्यास आणि जोडलेल्या फ्लेवरची माहिती अधिक ठळक करण्यास कंपनीने तयारी दर्शवली आहे.
म्हणजे बाटली बदलणार, लेबल बदलणार; पण प्रश्न अजून तसाच उभा आहे—ग्राहकाला बाटलीत नेमकं काय आहे, हे स्पष्टपणे सांगितलं जाणार का? न्यायालयाने सध्या FSSAIच्या विक्रीबंदीवर अंतरिम दिलासा दिलेला नाही. सुधारित लेबलची तपासणी करून त्यावर निर्णय घेण्यासाठी पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे ‘ओल्ड मॉन्क’ची बाटली दुकानात पुन्हा कधी दिसणार, याचे उत्तर अजून न्यायालयाच्या हातात आहे. नावात ‘ओल्ड’ असलं म्हणून सगळं जुनंच असतं, हा समज आता कायद्याच्या कसोटीवरच तपासला जाणार आहे.
