१,००० हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती; २०० पेक्षा जास्त शोधनिबंधांचे सादरीकरण
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० सप्टेंबर २०२६ ।। पिंपरी : पचन बिघडले की शरीराचे गणितच बिघडते, ही आयुर्वेदातील पारंपरिक संकल्पना आणि आधुनिक विज्ञानातील ‘गट हेल्थ’चा वाढता अभ्यास यांना एकाच व्यासपीठावर आणणारी ‘ग्रहणी मंथन २०२६’ ही राष्ट्रीय आयुर्वेद परिषद पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पडली. ग्रहणी, अग्नी, पचनक्रिया आणि आतड्यांचे आरोग्य या महत्त्वपूर्ण विषयांवर देशभरातील आयुर्वेद तज्ज्ञ, चिकित्सक, शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी सखोल विचारमंथन केले. ६ सप्टेंबर रोजी झालेल्या या राष्ट्रीय परिषदेला देशभरातून १,००० हून अधिक प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान आणि आधुनिक संशोधन यांच्यातील संवाद अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न या परिषदेत करण्यात आला.
निमा आयुर्वेद फोरम – केंद्रीय परिषद यांच्या वतीने आणि पी.डी.ई.ए. कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर, निगडी, पुणे यांच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा (MUHS) शैक्षणिक पाठिंबा तसेच भारतीय चिकित्सा पद्धतींसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची (NCISM) मान्यता परिषदेला लाभली. निमा आयुर्वेद फोरम – केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष वैद्य निलेश लोंढे, पी.डी.ई.ए. कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटरच्या प्राचार्या वैद्य रागिनी पाटील आणि पीएच.डी. संचालिका वैद्य मिनल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेश कुमार दधीच, गुजरात आयुर्वेद विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मानसी देशपांडे, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. एन. जे. पवार, एनसीआयएसएमचे सदस्य डॉ. मोहम्मद मझाहिर आलम, निमा सेंट्रल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी, महाराष्ट्र निमा अध्यक्ष डॉ. राजू तातेवार आणि महाराष्ट्र निमा आयुर्वेद फोरमचे अध्यक्ष वैद्य अमोल ठवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेत चार प्रमुख तज्ज्ञ वक्त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. वैद्य मनोज एम. देशपांडे, वैद्य वैभव मेहता, वैद्य श्रीरंग गलगली आणि वैद्य महेश ठाकूर यांनी ग्रहणी व पंचमहाभूतात्मक चिकित्सा, स्वयंप्रतिकार विकारांचा दृष्टिकोन, ग्रहणी व पंचकर्म तसेच निदान आणि चिकित्सा या विषयांवर सखोल विवेचन केले.
परिषदेतील दोन विशेष तज्ज्ञ परिसंवादांमध्ये एकूण आठ तज्ज्ञांनी सहभाग घेतला. ‘ग्रहणी व प्रणालीगत विकार’ या परिसंवादात वैद्य सोहम पाठक, वैद्य आशुतोष नानल, वैद्य रेणुका कुलकर्णी आणि वैद्य ज्योती मुंदर्गी यांनी आपले चिकित्सकीय अनुभव मांडले. तर ‘ग्रहणी व इतर आजार संबंध’ या परिसंवादात वैद्य मयूर सुराणा, वैद्य आदित्य इंदाणी, वैद्य विनिता देशमुख आणि वैद्य सतीश भट्टड यांनी विविध शास्त्रीय व चिकित्सकीय दृष्टिकोन स्पष्ट केले. परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे २०० हून अधिक शोधनिबंध आणि भित्तीपत्रकांचे सादरीकरण. आयुर्वेदातील ग्रहणी संकल्पना आणि आधुनिक विज्ञानातील आतड्यांचे आरोग्य, सूक्ष्मजीवसमूह, आतड्यांची संरक्षणभित्ती, प्रतिकारशक्ती आणि मेंदू-आतडे संबंध यांच्यातील शास्त्रीय संवादाला या परिषदेत चालना मिळाली. पारंपरिक ज्ञान, प्रत्यक्ष चिकित्सकीय अनुभव आणि आधुनिक संशोधन यांचा संगम घडवणारी ‘ग्रहणी मंथन २०२६’ ही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण ज्ञानपरिषद ठरली.
