लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुन्हा दीड हजार?

Spread the love

Loading

२४ सप्टेंबरनंतर ऑगस्टचा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता; मात्र सरकारकडून अंतिम तारीख अद्याप जाहीर नाही

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० सप्टेंबर २०२६ ।। गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आता लाडक्या बहिणींच्या नजरा बँक खात्याकडे लागल्या आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या ₹१,५०० हप्त्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार २४ सप्टेंबरनंतर पात्र महिलांच्या खात्यावर हा निधी टप्प्याटप्प्याने वर्ग होण्याची शक्यता आहे. मात्र २४ सप्टेंबर ही अधिकृत अंतिम तारीख नसून, शासनाकडून अद्याप निश्चित घोषणा झालेली नाही.

या योजनेतील पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० थेट लाभ हस्तांतरण अर्थात DBTच्या माध्यमातून दिले जातात. जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टच्या अखेरीस पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यानंतर ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू झाली. सप्टेंबरचा अर्धा महिना उलटल्यानंतरही पैसे न आल्याने महिलांमध्ये संभ्रम वाढला. आता निधी वितरणाची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र इथे आकड्यांचाही खेळ समजून घ्यावा लागेल. काही दिवसांपूर्वी योजनेचे लाभार्थी १ कोटी ६६ लाख असल्याचे वृत्त होते; ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीनंतर विविध अहवालांमध्ये ही संख्या सुमारे १ कोटी ६४ लाख ते १ कोटी ६५ लाख असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे सरसकट म्हणणे योग्य ठरणार नाही. पात्रता आणि पडताळणी पूर्ण असणे आवश्यक आहे.

ई-केवायसी प्रक्रियेमुळे योजनेतील लाभार्थी संख्या मोठ्या प्रमाणात बदलली आहे. अपात्र लाभार्थी, ई-केवायसी न केलेल्या महिला आणि अन्य कारणांमुळे अनेक नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे ‘पूर्वी पैसे मिळाले म्हणजे यावेळीही मिळतील’ असा हिशेब लावणे धोक्याचे आहे. संबंधित लाभार्थींनी अधिकृत पोर्टलवरील आपली स्थिती तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या २४ सप्टेंबरनंतर हप्ता सुरू होण्याची शक्यता एवढीच माहिती उपलब्ध आहे. सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतरच खात्यात पैसे नेमक्या कोणत्या दिवशी जमा होतील, हे स्पष्ट होईल. त्यामुळे सोशल मीडियावरील ‘आजच पैसे येणार’, ‘सर्वांना ₹३,००० मिळणार’ अशा संदेशांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत घोषणेची वाट पाहणेच योग्य ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *