महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० सप्टेंबर २०२६ ।। पिंपरी-चिंचवड : धर्म, भाषा, जात आणि प्रांत यांच्या भिंती उभ्या करून माणूस माणसापासून दूर जात असताना, ‘सेवा’ हा शब्द त्या भिंती पाडण्याचे काम करतो. याच सेवाभावाचा प्रत्यय देणाऱ्या ७९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचा शुभारंभ पिंपरी-चिंचवडमध्ये झाला. सेवा स्थळाचे उद्घाटन निरंकारी राजपिता रमितजी यांच्या हस्ते झाले. यावेळी मिशनच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य, केंद्रीय सेवादलाचे अधिकारी आणि हजारो श्रद्धाळू सहभागी झाले.
हरियाणातील समालखा येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळी २३ ते २६ ऑक्टोबर २०२६ दरम्यान हा संत समागम होणार आहे. सत्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या सान्निध्यात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने श्रद्धाळू येणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधूनही शेकडो सेवादार समागमस्थळी विविध सेवांसाठी सहभागी होणार आहेत.
शुभारंभाच्या कार्यक्रमात संत निरंकारी मंडळाच्या अध्यक्षा राजकुमारी ‘मामीजी’ आणि सचिव जोगिंदर सुखीजा यांनी पुष्पगुच्छ देऊन निरंकारी राजपिताजींचे स्वागत केले. यावेळी रमितजी यांनी सेवेला केवळ व्यवस्था सांभाळण्याचे काम न मानता, ती आत्मिक साधना असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, निःस्वार्थ सेवेत ‘मी’पण कमी होते आणि ‘आपण’पणाची जाणीव वाढते. मानवजन्माचा अर्थ केवळ स्वतःच्या सुखापुरता मर्यादित नसून, इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यात आहे, असा संदेश त्यांनी दिला.
यंदाच्या संत समागमाची संकल्पना ‘जागृती’ आहे. बाह्य जगातील धावपळीपेक्षा स्वतःच्या अंतरंगाकडे पाहणे, प्रत्येक क्षणी सजग राहणे आणि परिस्थिती कोणतीही असो, प्रभुस्मरणाशी जोडलेले राहणे, असा या संकल्पनेचा आशय मांडण्यात आला आहे. मात्र अशा विचारांची खरी कसोटी व्यासपीठावरच्या भाषणात नसून रोजच्या वर्तनातच लागते. सेवा, करुणा आणि मानवतेची भाषा बोलताना ती कृतीत उतरते का, हा खरा प्रश्न आहे.
संत निरंकारी मिशनच्या म्हणण्यानुसार, समागम हा कोणत्याही एका धर्म, जात किंवा प्रदेशापुरता मर्यादित नसून मानवतेच्या एकतेचा संदेश देणारा उपक्रम आहे. हजारो हात सेवेसाठी पुढे येतात आणि विविध पार्श्वभूमीचे लोक एका ठिकाणी एकत्र येतात. त्यामुळे या समागमाचा केंद्रबिंदू केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सेवा, समर्पण आणि मानवतेचा प्रत्यक्ष अनुभव ठरणार आहे.