![]()
बाहेर रंगरंगोटीचा झगमगाट; आत तुंबलेले ड्रेनेज, तुटलेल्या खिडक्या आणि वाढलेले गवत
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑक्टोबर २०२६ ।। पिंपरी : सरकारी इमारतींची देखभाल करण्याची जबाबदारी ज्या सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे, त्याच विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची अवस्था दयनीय असावी, हा सरकारी कारभाराचा काहीसा विचित्र विनोदच म्हणावा लागेल. पिंपरीतील अजमेरा कॉलनीच्या डब्ल्यू सेक्टरमधील पीडब्ल्यूडी वसाहतीत इमारतींना वरवर रंगरंगोटीचा मुलामा देण्यात आला असला, तरी आत मूलभूत सुविधांची वानवा असल्याचे पाहणीत दिसून आले. मोकळ्या जागांमध्ये वाढलेले गवत, साचलेला कचरा आणि झाडाझुडपांमुळे परिसराची अवस्था बकाल झाली आहे. त्यात तुटलेल्या गेटमधून भटक्या श्वानांचा वावर थेट इमारतींपर्यंत वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसाहतीतील रहिवाशांनी या समस्यांकडे संबंधित यंत्रणेने गांभीर्याने पाहण्याची मागणी केली आहे.
सगळ्यात गंभीर प्रश्न ड्रेनेजचा आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज चेंबर तुंबलेले असून सांडपाण्याच्या वाहिन्या तुटलेल्या अवस्थेत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी सांडपाणी इमारतीखाली झिरपत असल्याने दुर्गंधी आणि डासांचा त्रास वाढला आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असल्याची तक्रार आहे. खिडक्या, दरवाजे आणि जिन्यांचीही दुरवस्था झाली आहे. म्हणजे इमारतीला रंग दिला की देखभालीचे कर्तव्य संपते, असा काही नवा सरकारी नियम आला आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. परिसरातील वाढलेले गवत आणि कचरा हटविण्यासाठी अनेकदा रहिवाशांनाच पुढाकार घ्यावा लागतो. सरकारी वसाहतीची स्वच्छता आणि देखभाल ही रहिवाशांची नव्हे, तर संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे, हे सांगण्यासाठीही आता कदाचित स्वतंत्र आदेश काढावा लागेल.
वसाहतीतील काही जुन्या इमारतींना वड, पिंपळ यांसारखी मोठी झाडे अगदी खेटून वाढली आहेत. फांद्या भिंती आणि टेरेसपर्यंत पोहोचल्या असून मुळे इमारतींच्या दिशेने वाढत आहेत. वेळेत छाटणी न झाल्यास भविष्यात बांधकामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुलांसाठी स्वतंत्र खेळाचे मैदान नसल्याने उपलब्ध मोकळ्या जागांचाही उपयोग होत नाही. एका रहिवासी महिलेने, “सरकारी कर्मचाऱ्यांना घर देणे पुरेसे नाही; त्या घरात सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण देणेही शासनाची जबाबदारी आहे,” अशी भूमिका मांडली. पीडब्ल्यूडीच्या देखभालीखालील वसाहतीचीच अशी अवस्था असेल, तर ‘दिव्याखाली अंधार’ या म्हणीला यापेक्षा योग्य उदाहरण दुसरे कोणते? आता रंगाचा हात फिरवण्यापेक्षा ड्रेनेज, सुरक्षा, स्वच्छता आणि संरचनात्मक देखभालीचा हातभार लावणे अधिक गरजेचे आहे.
