महिलांच्या स्वावलंबनासाठी मोरवाडीत बचत गटांचा पुढाकार

Spread the love

Loading

उत्पन्नाचा नवा मार्ग खुला; पहिल्याच दिवशी स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद, स्टॉलची संख्या वाढण्याची शक्यता

महाराष्ट्र 24 ऑनलाईन -मोरवाडी : महिलांनी चूल आणि मूल सांभाळावे, चार पैसे कमावण्याची जबाबदारी मात्र दुसऱ्यांनीच घ्यावी, अशी जुनी समाजव्यवस्था आता बदलू लागली आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, कुटुंबाच्या संसारगाड्याला आर्थिक हातभार लावावा आणि स्वाभिमानाने जगावे, या उदात्त हेतूने म्हाडा-मोरवाडी परिसरात नवी दिशा सोशल फाऊंडेशन, अदिशक्ती क्लस्टर, सक्षमा आणि स्वामिनी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांसाठी दर गुरुवारी स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेविका सुप्रियाताई चांदगुडे आणि सोनाली हिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी या स्टॉलला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

या उपक्रमाची संकल्पना नवी दिशा सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा, अदिशक्ती क्लस्टरच्या अध्यक्षा आणि स्वामिनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुकाताई दिपक भोजने यांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्षात आणली. महिला बचत गटातील महिलांना घरबसल्या केवळ कष्ट करून थांबावे लागू नये, तर त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि त्यातून चार पैसे मिळून कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष आर्थिक संधी उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे आहे, हे या उपक्रमाने दाखवून दिले. परिसरातील महिला बचत गटांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. पहिल्या दिवसाच्या प्रतिसादामुळे आगामी काळात स्टॉलची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यावेळी भारती आव्हाड, सुप्रिया पांडे, रुपाली पाटील, प्रज्ञा माडगूळकर, फरीदा शेख आणि सविता कुशवाह उपस्थित होत्या.

या स्टॉलमध्ये हर्षिता येवले, कविता खिल्लारे, मंजुषा इंगळे, शिवानी विचारे, आशा मस्के, पूजा मरळे, सपना चौगले, प्रियंका घाडगे, स्वप्ना हेमाडे, अश्लेषा गुंडे आणि रेश्मा वेताळे यांनी आपले स्टॉल लावले होते. महिलांच्या या उत्साहाचे उपस्थितांनी कौतुक केले. विशेषतः सौ. रेणुकाताई भोजने यांच्या पुढाकाराचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात आले. त्यांचे पती श्री. दिपक भोजने हेही परिसरातील सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असतात. महिलांना केवळ सहानुभूती नको, तर संधी हवी; केवळ आश्वासन नको, तर उत्पन्नाचे साधन हवे, ही या उपक्रमाची खरी शिकवण आहे. दर गुरुवारी भरणारा हा स्टॉल महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *