बनावट वेबसाइट्सपासून सावध, पैसे वाचवा

Spread the love

Loading

आकर्षक सवलतींच्या आमिषाला बळी पडू नका; खरेदीपूर्वी वेबसाइटची लिंक, ॲपच्या परवानग्या आणि विक्रेत्याची विश्वासार्हता तपासा

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। डिजिटल व्यवहारांच्या जगात खरेदी एका क्लिकवर आली; पण त्याच क्लिकमधून खिसा रिकामा होण्याचा धोकाही वाढला आहे. स्वस्त वस्तू, प्रचंड सवलत आणि मोजक्या मिनिटांत संपणारी ऑफर दाखवून ग्राहकांना जाळ्यात ओढणाऱ्या बनावट वेबसाइट्स आणि ॲप्सपासून सावध राहण्याची गरज आहे. सायबर भामटे नामांकित कंपन्यांच्या वेबसाइटसारखी दिसणारी नावे तयार करतात.

मूळ संकेतस्थळाच्या पत्त्यात एखादे अक्षर बदलणे, अतिरिक्त शब्द जोडणे किंवा बनावट लिंक पाठवणे, अशा क्लृप्त्यांतून ग्राहकांची फसवणूक केली जाते. महागडा मोबाईल बाजारभावापेक्षा अविश्वसनीयरीत्या स्वस्त मिळत असल्याचा दावा दिसला, तर आनंदाने उडी मारण्याआधी संशय घ्या. वेबसाइटवरील चुकीची भाषा, विस्कळीत रचना आणि निकृष्ट छायाचित्रे ही धोक्याची चिन्हे असू शकतात; मात्र, देखणी वेबसाइट म्हणजे ती खात्रीशीरच, असा निष्कर्षही काढू नका. सायबर गुन्हेगारांचा मुखवटा अनेकदा अस्सल व्यवसायासारखाच असतो.

बनावट ॲप्सच्या बाबतीतही निष्काळजीपणा महागात पडू शकतो. एखादे साधे खरेदीचे ॲप संपर्क यादी, कॉल लॉग किंवा इतर असंबंधित संवेदनशील माहितीची परवानगी मागत असेल, तर ती देण्यापूर्वी विचार करा. ॲपचे रिव्ह्यू, डाउनलोडची संख्या, विकसकाची माहिती आणि नकारात्मक अभिप्राय तपासा; कारण रेटिंग आणि प्रतिक्रिया बनावटही असू शकतात. गुगल प्ले प्रोटेक्ट सुरू ठेवा. ते संभाव्य धोकादायक ॲप्स तपासून इशारा देण्यास मदत करते.

वेबसाइटवर HTTPS किंवा कुलूपाचे चिन्ह दिसले तरी ती पूर्णपणे सुरक्षित असल्याची हमी मिळत नाही. अनोळखी लिंकवरून आलेल्या ऑफर टाळा, ओटीपी किंवा यूपीआय पिन कोणालाही सांगू नका आणि संशयास्पद व्यवहार झाल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा. आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास १९३० या हेल्पलाइनवर त्वरित कळवा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल येथे तक्रार नोंदवा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *