![]()
स्वारगेट–कात्रज भुयारी मेट्रोसाठी मार्केट यार्ड परिसरात वळणांवर निर्बंध; १९ ऑक्टोबरपासून बदल लागू, पुढील आदेशापर्यंत पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन.
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पुण्यात रस्ते खोदले की वाहतूक कोंडी, वाहतूक कोंडी झाली की पर्यायी मार्ग आणि पर्यायी मार्ग शोधताना वाहनचालकांची होणारी दमछाक, हे आता शहराच्या रोजच्या जगण्याचे चित्र बनले आहे. स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे मार्केट यार्ड, पुष्पमंगल चौक आणि पुणे-सातारा रस्त्यावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हे बदल सोमवार, १९ ऑक्टोबरपासून प्रायोगिक तत्त्वावर लागू झाले असून पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. मेट्रोचे काम भविष्यात प्रवास सुलभ करण्यासाठी असले, तरी सध्या नागरिकांना वळणावळणांचा प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग समजून घेणे, हाच सध्या वेळ आणि इंधन वाचवण्याचा शहाणपणाचा उपाय ठरेल.
अप्पर बिबवेवाडीकडून चंद्रलोक चौक मार्गे पुष्पमंगल चौकात येणाऱ्या वाहनांना स्वारगेट, मार्केट यार्ड आणि उत्सव हॉटेलकडे उजवीकडे वळता येणार नाही. या वाहनांनी डावीकडे वळून तनिष्क शोरूमसमोरील मार्गाने अरणेश्वर बसथांब्याजवळ यू-टर्न घ्यावा आणि त्यानंतर स्वारगेटकडे जावे. पुष्पमंगल चौकातून मार्केट यार्ड किंवा उत्सव हॉटेल चौकाच्या दिशेने उजवीकडे वळण्यासही बंदी आहे. अशा वाहनचालकांनी पुढे जाऊन आदिनाथ सोसायटीजवळील यू-टर्नचा पर्याय वापरावा. मार्केट यार्ड किंवा उत्सव हॉटेल चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनाही उजवीकडे वळता येणार नाही. नियमांकडे दुर्लक्ष करून शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केल्यास प्रवास सुकर होण्याऐवजी अधिक वेळखाऊ ठरू शकतो. त्यामुळे फलक आणि पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे वाहनचालकांच्याच अडचणीत भर घालेल.
स्वारगेटकडून पुणे-सातारा रस्त्याने जाणाऱ्या तसेच मार्केट यार्डकडून सातारा, कात्रज आणि बिबवेवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना वेलनेस मेडिकल स्टोअर आणि भापकर पेट्रोल पंपाच्या बाजूने पुष्पमंगल चौकमार्गे कात्रज व अप्पर बिबवेवाडीकडे वळविण्यात आले आहे. मार्केट यार्डकडून येणाऱ्या वाहनचालकांनी वखार महामंडळ चौकातून इच्छित स्थळी जावे किंवा तनिष्क शोरूमसमोरील मार्गाने अरणेश्वर बसथांब्याजवळ यू-टर्न घ्यावा. पर्यायी मार्ग निवडताना वाहतूक पोलिसांचे निर्देश पाळणे आवश्यक आहे. या बदलांचा उद्देश बांधकाम परिसरातील कोंडी कमी करणे हा असला, तरी प्रत्यक्ष परिणाम वाहनचालकांच्या सहकार्यावर आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या काटेकोर अंमलबजावणीवर अवलंबून असेल. मेट्रोसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे; मात्र स्पष्ट दिशादर्शक फलक, पुरेसे कर्मचारी आणि वेळेवर माहिती देण्याची जबाबदारी प्रशासनानेही पार पाडली पाहिजे. विकासाच्या नावाखाली नागरिकांचा वेळ रोज वाया जाणे अपरिहार्य मानता येणार नाही.
