![]()
दिवाळीच्या तोंडावर FDA ची राज्यव्यापी धडक; ऑलिव्ह ऑइलच्या नावाखाली शेंगदाणा तेल, पुण्यात हजारो किलो पनीर जप्त, मुंबईतील चार आस्थापनांचे परवाने निलंबित.
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। महाराष्ट्रात दिवाळीचा गोडवा वाढवण्याऐवजी नागरिकांच्या ताटात भेसळीचे विष वाढवणाऱ्या विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जोरदार दणका दिला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २१ ऑक्टोबरदरम्यान राबवलेल्या राज्यव्यापी मोहिमेत तब्बल ३ कोटी ११ लाख रुपयांहून अधिक किमतीचा संशयित, असुरक्षित आणि निकृष्ट अन्नसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये ३२ हजार ६१ लिटर खाद्यतेल आणि ३७ हजार १२८ किलो इतर अन्नपदार्थांचा समावेश आहे. भिवंडीतील विराज एंटरप्रायझेसच्या साठ्यातील Jivo ब्रँडचे Pomace Olive Oil प्रयोगशाळेच्या तपासणीत ऑलिव्ह तेलाऐवजी शेंगदाणा तेल असल्याचे निष्पन्न झाले. तेलाच्या बाटलीवर एक नाव आणि आत दुसराच माल, हा ग्राहकांच्या विश्वासावर घातलेला उघड दरोडाच आहे. या कारवाईत ११ हजार ७७९ लिटर खाद्यतेल आणि २ हजार ८५० किलो चहा असा एकूण १ कोटी २७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. ग्राहकांनी पैसे मोजायचे प्रीमियम तेलाचे आणि पदरात पडायचे वेगळेच तेल, हा प्रकार गंभीर आहे.
पुण्यातील बावधन, कसबा पेठ, बिबवेवाडी आणि पौड रोड परिसरात अनियंत्रित तापमानात साठवलेले ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा आणि ९ हजार ८८८ लिटर खाद्यतेल जप्त करण्यात आले. धाराशिव आणि परभणी परिसरात खवा, पेढे, कलाकंद, तूप तसेच शेव-फरसाण मिश्रणाचा सुमारे ३३ हजार ९४० किलो साठा, अंदाजे ८७.५२ लाख रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला. जालना येथे प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू वाहून नेणारा आयशर टेम्पो पकडून वाहनासह ९३.४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागपूर आणि चंद्रपूरमधील वरोरा येथे अस्वच्छ साठवणुकीतील १ हजार ७८ लिटर रिफाइंड सोयाबीन तेल आणि ४९ किलो संशयित निकृष्ट खवा जप्त झाला. कांदिवली पूर्व-पश्चिम भागात रंगाचा संशय असलेले बटाटा-केळी वेफर्स, शेजवान स्टिक्स, जिलेबी आणि महाराजा हलवा नष्ट करण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे सनराईज ब्रँडची ८७ किलो संशयित भेसळयुक्त व निकृष्ट भगरही जप्त झाली.
मुंबईतील हॉटेल व्यवसायातील अस्वच्छतेनेही प्रशासनाचे डोळे उघडले आहेत. बोरीवलीतील ‘अरबियन रॉवर्मा कॅफे’, माहिममधील ‘नाथ फास्ट फूड’, ‘नायर ऑन फायर क्लाऊड किचन’ आणि ‘बिकानेर स्वीट्स अँड नमकीन’ या चार आस्थापनांचे परवाने निलंबित करून व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. अस्वच्छ स्वयंपाकघर, ड्रेनेजच्या समस्या, गंजलेले रॅक, शिळ्या पावाची ताज्या पावात मिसळ, कामगारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे नसणे आणि मिठाईतील अनधिकृत खाद्यरंग असे गंभीर प्रकार तपासणीत समोर आले. साकीनाका येथे अवैध तंबाखू वाहतुकीप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला.
या कारवाया स्वागतार्ह असल्या, तरी प्रश्न एवढाच की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे हे प्रकार तपासणी होईपर्यंत सुरूच कसे राहतात? दिवाळीपुरती धडक मोहीम नको; नियमित तपासणी, प्रयोगशाळांचे अहवाल, दोषींवर खटले आणि न्यायालयीन शिक्षेपर्यंत पाठपुरावा हवा. केवळ साठा जप्त करून भागणार नाही; भेसळीच्या साखळीतील उत्पादक, पुरवठादार आणि विक्रेत्यांपर्यंत कारवाई पोहोचली पाहिजे. अन्यथा दंड भरून पुन्हा तोच धंदा सुरू करण्याची मुभा मिळेल. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील FDA ने आता कारवाईचा हा धडाका सातत्याने कायम ठेवावा. ग्राहकांचे आरोग्य हे कोणत्याही व्यापाऱ्याच्या नफ्यापेक्षा मोठे आहे, हे प्रशासनाने कृतीतून सिद्ध करावे.
