![]()
७९व्या निरंकारी संत समागमात सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांचे विचार; ग्लोबल पीस अवॉर्डने सन्मान
महाराष्ट्र 24- , २५ ऑक्टोबर : माणसाच्या हातात दिवा असला, म्हणून त्याच्या मनात प्रकाश पडतोच असे नाही! मनातील अंधार दूर करण्यासाठी विचारांत जागृती, वर्तनात नम्रता आणि भावनांत माणुसकी हवी. हाच जिवंत संदेश ७९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी दिला. देश-विदेशांतून जमलेल्या लाखो श्रद्धाळूंच्या उपस्थितीत भक्तीचा गजर झाला; पण या भक्तीचे खरे मोल बाह्य थाटात नसून जीवनातील आचरणात आहे, हे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.
चार दिवसांच्या या संत समागमाने विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांना एकाच व्यासपीठावर आणले आहे. श्रद्धेचे मार्ग वेगवेगळे असले, तरी माणुसकीचा रस्ता एकच असतो, याची प्रचिती येथे येत आहे. प्रेम, सौहार्द, सद्भावना आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात आध्यात्मिक चेतनेबरोबरच आत्मपरीक्षणाचीही हाक घुमत आहे.
सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी स्पष्ट केले की, जागरूकता म्हणजे केवळ बाहेर काय घडते यावर नजर ठेवणे नव्हे; तर आपल्या विचारांतील विकार, वर्तनातील उणिवा आणि भावनांतील अस्थिरता ओळखणे होय. खरी भक्ती दिखाव्याच्या झगमगाटात सापडत नाही. ती प्रेम, नम्रता, सहनशीलता आणि सत्याच्या आचरणातून प्रकटते. काळ बदलतो, जीवनशैली बदलते; पण सत्याचा आधार सुटला, तर अध्यात्माचा पाया डळमळतो. सत्संगात ऐकलेले विचार जीवनात उतरले, तरच त्याची सार्थकता!
यापूर्वी निरंकारी राजपिता रमित जी यांनी दृष्टिहीन व्यक्ती आणि कंदिलाचे उदाहरण देत बाह्य स्वरूपापेक्षा अंतःकरणातील प्रकाशाचे महत्त्व पटवून दिले. ब्रह्मज्ञान, प्रेम आणि समर्पण यांची ज्योत सेवा, सुमिरन आणि सत्संगातून तेवत ठेवणे, हीच खरी आध्यात्मिक जागृती असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चिश्ती फाउंडेशनच्या वतीने सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांना ग्लोबल पीस अवॉर्ड प्रदान करण्यात आला. शांततेचा संदेश केवळ भाषणांत नव्हे, तर कृतीत उतरावा, याची आठवण या सन्मानाने करून दिली.
प्रदर्शनांतून सेवेचा जागर
समागमातील निरंकारी प्रदर्शनीही लक्षवेधी ठरली आहे. मुख्य प्रदर्शनीत मिशनचा इतिहास, आध्यात्मिक प्रवास आणि ‘जागृती’ या विषयावर आधारित तीन विशेष मॉडेल्स सादर करण्यात आली आहेत. बाल प्रदर्शनीतून मुलांना नैतिक मूल्ये, चांगले संस्कार आणि भावनिक विकासाची शिकवण दिली जात आहे. तर एस.एन.सी.एफ. प्रदर्शनीत रक्तदान, आरोग्यसेवा, सामाजिक जागृती आणि सामूहिक विवाह यांसारख्या उपक्रमांतून निःस्वार्थ सेवेचे दर्शन घडते.
अखेर प्रश्न एवढाच—समागमातून बाहेर पडताना हात जोडलेले असतील; पण मनही जोडलेले असेल का? कारण प्रकाशाची खरी परीक्षा दिव्याच्या तेजात नसते, तर तो अंधार किती दूर करतो, यात असते!