पुणे-पिंपरीसह जिल्ह्यात एफडीएचे छापे; निकृष्ट साठा जप्त, परवाने निलंबित आणि विनापरवाना दुकानांना टाळे ठोकण्याचे आदेश
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दिवाळीच्या ताटात गोडवा वाढवण्यासाठी घेतलेली मिठाईच आरोग्याला कडू अनुभव देणार असेल, तर ग्राहकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर? सणासुदीच्या मागणीचा फायदा घेत अन्नसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या मिठाई विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात धडक कारवाई केली. दहा ठिकाणांवरील छाप्यांत सुमारे नऊ लाख ३९ हजार रुपयांचा खाद्यसाठा जप्त करण्यात आला; त्यातील सुमारे दीड हजार किलो अन्नपदार्थ जागीच नष्ट केल्याची माहिती आहे. कॅम्पमधील मे. कराची स्वीट मार्ट येथे ९० हजार ७८० रुपये किमतीचे १८६ किलो मोतीचूर लाडू, खवा आणि मलाई पेढा जप्त करण्यात आला. सिंथेटिक रंगांच्या वापराची प्रमाणनोंद नसणे, खव्याच्या खरेदी-साठवणुकीतील त्रुटी आणि कालबाह्य चोको स्टिक्सचा वापर आढळल्याने परवाना निलंबित करण्यात आला. अन्नसुरक्षेच्या नियमांना गोडधोड समजणाऱ्यांना प्रशासनाने दिलेली ही चपराक आहे.
वानवडीतील मे. पौर्णिमा स्वीट्स आणि मुंढव्यातील मे. जनता स्वीट्स यांच्याकडे वैध परवाना नसल्याने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. पौर्णिमा स्वीट्समधून ५८ किलो कलाकंद, तर शिवाजीनगरच्या मे. न्यू क्वालिटी डेअरी फार्ममधून १०४ किलो दही, क्रीम, गायीचे दूध, पनीर व तूप जप्त झाले. मोहम्मदवाडीतील मे. बिकानेर मिठाईवाले येथील २६८ किलो बर्फी अयोग्य साठवणुकीमुळे जप्त झाली. मुळशीतील मान येथील मे. चामुंडा माँ रबडीवाला येथून ४८६ किलो रबडी व रसगुल्ला, शिक्रापूरच्या मे. श्री गणेश लाडूवाले येथून ६०५ किलो लाडू व म्हैसूर पाक, तर मंचरच्या मे. राजमिलन स्वीट्समधून २५० किलो मावा जप्त करण्यात आला. खेड तालुक्यातील शिरोली येथील मे. अंबिका फूड्समधून ६४८ किलो सोनपापडी जप्त करून उत्पादन केंद्राचा परवाना निलंबित केला.
पिंपळे सौदागरमधील मे. भायल स्वीट्स आणि काळेवाडीतील मे. पुणेरी स्वीट्स येथून अनुक्रमे ९२.५ किलो आणि ३५ किलो खाद्यपदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले. या कारवायांमधील काही आस्थापनांचे परवाने निलंबित, तर विनापरवाना व्यवसायांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ही तपासणी सुरू आहे. संयुक्त आयुक्त श्रीकांत करकाळे यांनी कराची स्वीट मार्टमधील त्रुटींची माहिती दिली; अन्नसुरक्षा अधिकारी एस. एस. हाके आणि सहाय्यक आयुक्त एन. आर. सरकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी झाली. दरम्यान, पुणे विभागातील व्यापक मोहिमेत पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमधील १५ आस्थापनांतून ३,१९६ किलोहून अधिक अन्नसाठा जप्त, १,४४० किलो साठा नष्ट आणि आठ परवाने निलंबित केल्याचे स्वतंत्र वृत्त आहे. त्यामुळे दहा ठिकाणांची कारवाई आणि विभागीय एकत्रित आकडेवारी यांची सरमिसळ करू नये. ग्राहकांनी मिठाई घेताना उत्पादन तारीख, मुदत, परवाना आणि साठवणुकीची स्थिती तपासावी. सणाचा गोडवा विकत घेताना आजाराची पुडी पदरात पडू नये, एवढीच अपेक्षा!
