Diwali Ready Made Faral: फराळाच्या ताटात बदलत्या काळाची चव

Spread the love

Loading

वेळेच्या टंचाईमुळे रेडिमेड पदार्थांना पसंती; पिंपरी-चिंचवडमध्ये मागणीत ३० ते ४० टक्क्यांची वाढ, कॉम्बो पॅक आणि आरोग्यदायी पर्यायांनाही प्रतिसाद

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दिवाळी म्हटली की घराघरांत चिवडा, चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे आणि शेव यांचा दरवळ असायचा. फराळ बनवण्यासाठी घरातील महिलांची चार-चार दिवसांची लगबग हा सणाचा अविभाज्य भाग होता. आता मात्र काळ बदलला, कुटुंबांची रचना बदलली आणि नोकरी-व्यवसायाच्या धावपळीत स्वयंपाकघरातील पारंपरिक तयारीला वेळ उरलेला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये रेडिमेड फराळाला मोठी पसंती मिळत आहे. विक्रेत्यांच्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मागणीत ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. घरगुती फराळ व्यावसायिक आणि बचतगटांसाठी ही संधी ठरत असली, तरी घरच्या चवीची परंपरा आता बाजाराच्या पिशवीतून घराघरांत पोहोचत आहे.

ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार बाजारात २५० ग्रॅमचे कॉम्बो पॅक उपलब्ध झाले आहेत. चकली, लाडू, करंजी, चिवडा आणि शंकरपाळी असलेल्या पॅकची किंमत ६०० ते ८०० रुपये, तर ५०० ग्रॅमच्या पॅकसाठी सुमारे १,३०० रुपये मोजावे लागत आहेत. नाचणीची चकली, गुळाची चकली, बेक्ड चकली आणि मिलेट्सचे लाडू असे आरोग्यदायी पर्यायही तरुणाईला आकर्षित करत आहेत. फराळ विक्रेत्या सविता शिंदे यांनी चकली, अनारसे आणि चिरोट्यांना विशेष मागणी असल्याचे सांगितले. अंकिता राऊत यांनी व्यावसायिक गॅस, तेल आणि तुपाच्या दरवाढीमुळे फराळ महागल्याचे नमूद केले. पुण्यातील बाजारात कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे फराळाचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याचेही वृत्त आहे.

या बदलत्या बाजारपेठेत घरगुती उद्योजिकांसाठी उत्पन्नाचे नवे दार उघडले आहे. पुण्यातील श्वेता कुलकर्णी, अंजना चव्हाण आणि प्रार्थना दिवेकर यांसारख्या फराळ व्यावसायिकांनीही वाढत्या मागणीचा अनुभव नोंदवला आहे. हडपसरमधील नम्रता साळवे यांनी नातेवाईकांना भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात फराळ खरेदी करण्याचा कल सांगितला आहे. मात्र, रेडिमेड फराळ घेताना केवळ आकर्षक पॅकिंग आणि स्वस्त दर पाहून चालणार नाही. उत्पादकाचे नाव, उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम तारीख, घटक आणि एफएसएसएआय परवाना क्रमांक तपासणे गरजेचे आहे. वेळ वाचवण्याच्या नादात आरोग्य धोक्यात घालणे शहाणपणाचे नाही. परंपरा बदलली तरी चवीसोबत दर्जा आणि सुरक्षिततेची तडजोड होता कामा नये.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *