![]()
मुंबईत पारा ३६.९ अंशांवर; पुण्यात ३३.१ अंश तापमान, दिवसा उकाडा आणि रात्री तुलनेने गारवा
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। IMD Maharashtra weather forecast : ऑक्टोबर संपला, पावसाळा मागे सरकला; पण उन्हाचा मुक्काम काही हलण्याचे नाव घेत नाही! नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमानाचा पारा चढलेला असून नागरिकांना थंडीऐवजी उकाड्याचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ६ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, मुंबईत कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २६.३ अंश नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमान ३३.१ आणि किमान १९.१ अंश होते. मुंबईतील कुलाबा केंद्रावरील कमाल तापमान सामान्यपेक्षा २.६ अंशांनी अधिक होते. त्यामुळे दिवसा उन्हाचा तडाखा आणि पहाटे तुलनेने कमी तापमान, असा संमिश्र अनुभव राज्यातील नागरिक घेत आहेत.

ही केवळ एखाद्या दिवसाची तात्पुरती तफावत नाही. हवामान विभागाच्या ३१ ऑक्टोबरच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंदाजानुसार, देशातील बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही दिवसाचे तापमान चढे राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, मध्य आणि पूर्व भारतातील काही भागांत किमान तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहू शकते. म्हणजेच दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री तुलनेने गारवा, हे चित्र कायम राहू शकते. मुंबई, पुणे आणि परिसरात पुढील काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज असून पावसाची शक्यता अत्यल्प आहे.
हवामान विभागाने नोव्हेंबरच्या मासिक अंदाजात वाढत्या कमाल तापमानाचा इशारा दिला असला, तरी याचा अर्थ राज्यात उष्णतेची लाट जाहीर झाली आहे, असा नाही. पुणे आणि मुंबईच्या स्थानिक अंदाजात सध्या कोणताही इशारा नोंदवलेला नाही. मात्र, उन्हात दीर्घकाळ काम करणारे कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी दुपारच्या तीव्र उन्हात काळजी घ्यावी. पुरेसे पाणी पिणे, डोक्याचे संरक्षण करणे आणि शक्यतो दुपारच्या उन्हातील अनावश्यक बाहेर पडणे टाळणे हिताचे ठरेल. नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहूल लागेल, या अपेक्षेने बसलेल्या नागरिकांना सध्या उन्हाशीच दोन हात करावे लागत आहेत.