सुटे दूध घेण्याआधी सावधान! शेतकऱ्यांकडील कच्चे दूध आणि दुकानातील सुटे दूध यात मोठा फरक; चार अंश तापमानाचा नियम, तूप-तेलातील भेसळखोरांनाही थेट इशारा
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। Tukaram Mundhe on Milk and Ghee: सकाळी चहाचा कप हातात घेताना त्यातील दूध कुठून आले, कसे साठवले गेले आणि किती वेळ प्रवास करून आपल्या घरापर्यंत पोहोचले, याचा विचार किती जण करतात? दूध पांढरे दिसते म्हणून ते शुद्ध असल्याची हमी मिळत नाही! राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याच बेफिकिरीवर बोट ठेवत ग्राहकांना सुटे दूध खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांकडून थेट मिळणारे कच्चे दूध आणि पाश्चराइज्ड करून दुकानात सुटे विकले जाणारे दूध यातील फरक स्पष्ट केला आहे. शेतकऱ्याकडून थेट कच्चे दूध घेणे आणि प्रक्रिया केलेले दूध पॅकेटमधून बाहेर काढून सुटे विकणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. पाश्चराइज्ड दूध सीलबंद पिशवीत किंवा पॅकेटमध्येच घ्यावे. त्यावरील उत्पादन तारीख, अंतिम वापराची तारीख आणि साठवणुकीच्या सूचना तपासाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दुधाच्या गुणवत्तेचा खरा खेळ त्याच्या वाहतुकीत आणि साठवणुकीत सुरू होतो. दूध काढल्यानंतर ते किती वेळात शीतकरण केंद्रात पोहोचते, वाहतुकीचा टँकर स्वच्छ आहे का आणि दुकानातील शीतकपाटात योग्य तापमान राखले जाते का, हे ग्राहकांच्या नजरेआड राहते. मुंढे यांनी दूध साधारण चार अंश सेल्सिअस तापमानात ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. दूध काढल्यानंतर दोन तासांच्या आत ते थंड करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यात आम्लता वाढू लागते. ही साखळी मोडली की दुधाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. वरून दूध पांढरे आणि ताजे दिसले तरी त्याची गुणवत्ता सुरक्षित असेलच असे नाही. त्यामुळे केवळ स्वस्त दराच्या मोहात पडून अज्ञात स्रोताकडून दूध घेणे म्हणजे आरोग्याशी जुगार खेळण्यासारखे आहे.
मुंढे यांनी तूप, लोणी आणि वनस्पती तेलातील भेसळीबाबतही विक्रेत्यांना कठोर इशारा दिला आहे. या पदार्थांमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. आधार नसताना ‘शुद्ध देसी तूप’, ‘शंभर टक्के शुद्ध’ अशा आकर्षक जाहिराती करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्राहकांनीही पॅकेजिंग, उत्पादकाचे नाव, बॅच क्रमांक, परवाना आणि लेबलवरील माहिती तपासावी. संशयास्पद पदार्थ किंवा भेसळ आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. कारण भेसळखोरांचा नफा आणि ग्राहकांचे आरोग्य यांची तुलना होऊ शकत नाही. दूध, तूप आणि तेलाच्या नावाखाली विषारी व्यवहार करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसलाच पाहिजे!
