शंकर जगताप यांचा पुढाकार; १९ व २० नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयात तपासणी, कर्करोग निदान आणि पात्र महिलांवर मोफत शस्त्रक्रिया
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पिंपरी, दि. १८ नोव्हेंबर : महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे घरातील जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मासिक पाळीतील अनियमितता, अतिरक्तस्राव, गर्भाशयाच्या गाठी, वंध्यत्व, स्तनांमधील गाठी किंवा रजोनिवृत्तीनंतरच्या समस्या असोत; वेळीच तपासणी न केल्यास साधा आजारही गंभीर रूप धारण करू शकतो. ही बाब लक्षात घेऊन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून १९ आणि २० नोव्हेंबर रोजी पिंपरी येथील जिल्हा रुग्णालयात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे शिबिर दोन्ही दिवशी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहणार आहे. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा हा प्रयत्न स्वागतार्ह असला, तरी त्याचा लाभ प्रत्यक्ष गरजू महिलांपर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे.
तपासणीच्या सुविधांमध्ये रक्त तपासणी, पोट व स्तनांची सोनोग्राफी, स्तनांची तपासणी आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठी पॅप स्मिअर चाचणीचा समावेश आहे. आवश्यकतेनुसार सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासणीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. मासिक पाळीतील त्रास, पोटदुखी, गर्भधारणेतील अडचणी, वंध्यत्व, कंबरदुखी, मूत्राशयाच्या तक्रारी तसेच गर्भाशय व अंडाशयातील गाठींबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. आहार, जीवनशैली, मानसिक आरोग्य आणि रजोनिवृत्तीविषयीही समुपदेशन केले जाईल. विशेष म्हणजे, केवळ तपासणी करून महिलांना घरी पाठविण्याऐवजी पुढील उपचारांची दिशाही या शिबिरातून मिळणार आहे.
शस्त्रक्रियेची गरज असलेल्या पात्र महिलांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ओपन तसेच लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या जाणार आहेत. अशी माहिती डॉ. देविदास शेलार यांनी दिली. शिबिरासाठी येताना महिलांनी आधार कार्ड, आयुष्मान भारत कार्ड आणि रेशन कार्ड सोबत आणावे. महिलांनी आजार अंगावर काढण्याची सवय सोडून वेळेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.