![]()
एआयच्या मदतीने आक्षेपार्ह पोस्टची आधीच तपासणी; भारतात वापरकर्त्यांच्या तक्रारी निम्म्यावर आल्याचा मेटाचा दावा, मात्र कंटेंटवर सरसकट बंदी नाही
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। सोशल मीडियाच्या जगात वापरकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी कोणत्या थराला जायचे, याची जणू स्पर्धाच सुरू असताना मेटाने इन्स्टाग्रामच्या शिफारस प्रणालीत भारतासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. लैंगिकदृष्ट्या सूचक आणि हिंसाचार दर्शविणाऱ्या पोस्ट वापरकर्त्यांच्या फीड, रील्स आणि एक्सप्लोरमध्ये कमी दिसाव्यात, यासाठी नवी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. १६ नोव्हेंबरला मेटाने याबाबत अधिकृत माहिती दिली; १७ नोव्हेंबरला ही बातमी समोर आली. आता वापरकर्त्याने तक्रार केल्यानंतरच जागे होण्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पोस्ट शिफारस करण्यापूर्वीच तिची तपासणी करणार आहे. मेटाच्या दाव्यानुसार, या बदलांनंतर भारतात शिफारस केलेल्या आक्षेपार्ह कंटेंटबाबतच्या तक्रारी वर्षभरापूर्वीच्या तुलनेत सुमारे ५० टक्क्यांनी घटल्या आहेत. मात्र, कंपनीने तक्रारींची नेमकी संख्या किंवा रोखलेल्या पोस्टचे प्रमाण जाहीर केलेले नाही.
या निर्णयाचा अर्थ अश्लील किंवा हिंसक पोस्ट इन्स्टाग्रामवरून पूर्णपणे हटविल्या जातील, असा अजिबात नाही. मेटाने स्पष्ट केले आहे की, हे बदल मुख्यतः वापरकर्ते फॉलो करत नसलेल्या खात्यांतील पोस्ट त्यांच्या समोर सुचविण्याच्या प्रक्रियेला लागू आहेत. समुदाय नियमांचे उल्लंघन करणारा मजकूर हटविण्याची स्वतंत्र व्यवस्था कायम आहे; तर नियम न मोडणारा, पण संवेदनशील किंवा आक्षेपार्ह वाटणारा मजकूर प्लॅटफॉर्मवर राहू शकतो, मात्र त्याचा प्रसार मर्यादित केला जाईल. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) १० ऑक्टोबरला दिशाभूल करणारा, फेरफार केलेला किंवा हिंसाचार भडकवू शकणारा मजकूर अल्गोरिदमद्वारे अनावश्यकपणे वाढविला जाऊ नये, यासाठी मेटाला शिफारस प्रणालीचा आढावा घेण्यास सांगितले होते. ऑगस्टमध्ये गृह मंत्रालयाच्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) सोबतही चर्चा झाली होती. मात्र, या सरकारी सूचनांमुळेच नवा बदल करण्यात आल्याचे मेटाने स्पष्टपणे मान्य केलेले नाही.
वापरकर्त्यांच्या हातातही काही सुरक्षा पर्याय आहेत. Settings and Activity मधील Content Preferences मध्ये जाऊन Sensitive Content Control द्वारे संवेदनशील पोस्ट कमी करता येतात. Political Content Control मधून फॉलो न केलेल्या खात्यांवरील राजकीय मजकूर मर्यादित करता येतो. एखादी पोस्ट नको असल्यास ‘Not Interested’ निवडता येते; तर Hidden Words द्वारे टिप्पण्या आणि संदेशांतील निवडक शब्द, वाक्ये व इमोजी फिल्टर करता येतात. किशोरवयीन वापरकर्त्यांसाठी Teen Accounts अंतर्गत १३+ वयोगटाला अनुरूप कंटेंट सेटिंग लागू आहे. मात्र, अल्गोरिदम कितीही हुशार झाला तरी डिजिटल जगातील प्रत्येक अयोग्य गोष्ट रोखण्याची हमी नाही. तंत्रज्ञानाबरोबर पालकांचे मार्गदर्शन, वापरकर्त्यांची जागरूकता आणि मेटाची पारदर्शक जबाबदारीही तितकीच आवश्यक आहे.
