रंगभूमीचा राष्ट्रीय महोत्सव सज्ज !

Spread the love

Loading

निगडीतील गदिमा नाट्यगृहात २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान रंगणार नाट्याविष्कार; पाच नाट्यप्रयोग, दिग्गजांचे मार्गदर्शन आणि वामन पंडित यांचा सन्मान

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पिंपरी, दि. २० : शहराची ओळख केवळ उद्योगनगरी म्हणूनच राहू नये, तर कला, साहित्य आणि नाट्यसंस्कृतीचेही केंद्र व्हावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढाकार घेतला आहे. मात्र, सांस्कृतिक नगरी होण्याचा दावा केवळ भव्य इमारती उभारून सिद्ध होत नाही; त्यासाठी दर्जेदार कलाविष्कारांना व्यासपीठ आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे लागते. याच भूमिकेतून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ या राष्ट्रीय नाट्यप्रयोगकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात हा महोत्सव रंगणार आहे. महापौर रवी लांडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, उपायुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि प्रभाकर पवार उपस्थित होते.

या महोत्सवात कोलकाता, केरळ, आसाम, ओरिसा, दिल्ली, मुंबई आणि पुणे येथील रंगकर्मी सहभागी होणार आहेत. नांदीसह नाट्यगीतांचा सांगीतिक कार्यक्रम, पाच राष्ट्रीय स्तरावरील नाट्यप्रयोग, दिग्गजांचे पाच अभ्यासवर्ग, रंगमंथन परिसंवाद आणि चित्र-शिल्प प्रदर्शन अशी कार्यक्रमांची मेजवानी असेल. कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने विशेष काव्यात्मक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा ‘रंगानुभूती सन्मान’ ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित (कणकवली) यांना प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी, ज्येष्ठ नाटककार जब्बार पटेल, सतीश आळेकर, एफटीआयआयचे माजी विभागप्रमुख प्रा. समर नखाते आणि पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांची उपस्थिती महोत्सवाला लाभणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप वेलणकर आणि शाम पेठकर यांच्याशी परिसंवादात संवाद साधला जाणार आहे.

या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ व्यावसायिक मनोरंजन नव्हे, तर प्रायोगिक कलांना मिळणारे व्यासपीठ. स्थानिक शाळा, महाविद्यालये, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांनाही विविध उपक्रमांत सहभागी करून घेतले जाणार आहे. शहराचा सांस्कृतिक वारसा चित्रकला आणि शिल्पकलेतून मांडण्याचाही प्रयत्न असेल. जब्बार पटेल, सतीश आळेकर, प्रा. समर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाची आखणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. त्यामुळे नाट्यरसिकांना दर्जेदार प्रयोग पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र, अशा महोत्सवांचा खरा कस चार दिवसांच्या गर्दीत नसून वर्षभर शहरात कलावंतांना मिळणाऱ्या संधींमध्ये असतो. महापालिकेने हा सांस्कृतिक जागर केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सातत्यपूर्ण चळवळ बनवावा, हीच अपेक्षा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *