Indian Railways : बुलेट ट्रेनचे पहिले स्टेशन कोणते?

Spread the love

Loading

सुरत-वापी मार्गावर २०२७ च्या अखेरच्या तिमाहीत पहिली सेवा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा, मुंबईपर्यंतचा प्रवास टप्प्याटप्प्याने सुरू होणार

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। देशात बुलेट ट्रेन धावण्याचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. मात्र, मुंबईकरांनी सध्या आनंदाने उड्या मारण्यापेक्षा थोडी प्रतीक्षा करण्याची तयारी ठेवावी! कारण देशातील पहिली हायस्पीड रेल्वे थेट मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणार नसून, सुरुवातीला गुजरातमधील सुरत ते वापी या टप्प्यावर प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २० नोव्हेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, २०२७ च्या शेवटच्या तिमाहीत या मार्गावर पहिली सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण ५०८ किलोमीटरचा मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉर मात्र टप्प्याटप्प्याने खुला केला जाणार आहे. म्हणजेच बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात येत असले, तरी मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी जपानच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याने होत असून, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे त्याची जबाबदारी आहे.

सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत ४५६ किलोमीटरचे पिअर बांधकाम आणि ३७१ किलोमीटरचा व्हायाडक्ट पूर्ण झाल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. २९९ किलोमीटर मार्गावर सहा लाख नॉइज बॅरिअर्स, तर २०६ किलोमीटर व्हायाडक्टवर ९,३०० ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशनचे खांब बसवण्यात आले आहेत. चार डोंगरी बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून, महाराष्ट्रातील २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी पाच किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. यातील सात किलोमीटरचा भाग ठाणे खाडीखाली जाणार आहे. भारतातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा ही या प्रकल्पाची वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरणार आहे. साबरमती, सुरत आणि ठाणे येथील तिन्ही ट्रेन डेपोचे काम सुरू आहे. आठ स्थानकांचे सिव्हिल बांधकाम पूर्ण झाले असून, अंतर्गत सजावटीचे काम सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

या मार्गावर मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी १२ स्थानके नियोजित आहेत. ट्रेनचा परिचालन वेग ताशी ३२० किलोमीटर असेल; मर्यादित थांब्यांसह मुंबई-अहमदाबाद प्रवास सुमारे एक तास ५८ मिनिटांत पूर्ण होण्याचे नियोजन आहे. सर्व स्थानकांवर थांबणाऱ्या सेवेला अधिक वेळ लागेल. देशी बनावटीची बी-२८ ट्रेन इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) आणि बीईएमएल (BEML) विकसित करत आहेत. तिचा डिझाइन वेग ताशी २८० किलोमीटर असून, २०२७ च्या मध्यापर्यंत रुळांवरील चाचण्या अपेक्षित आहेत. पुढील टप्प्यात ताशी ३५० किलोमीटर डिझाइन वेगाची बी-३५ ट्रेन विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. वेगाचे आकर्षण मोठे असले, तरी वेळापत्रक, सुरक्षा आणि प्रत्यक्ष सेवा सुरू होणे यांची कसोटी अजून बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *