महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी निवड; पिंपरी-चिंचवडच्या वकीलवर्गाचा गौरव
महाराष्ट्र्र 24 -पिंपरी-चिंचवड : वकिली म्हणजे केवळ कायद्याची कलमे मांडण्याचा व्यवसाय नव्हे, तर न्यायाच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची जबाबदारी! ही जबाबदारी तब्बल ३३ वर्षे निष्ठेने पार पाडणारे पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. संजय भाऊसाहेब दातीर पाटील यांची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी (चेअरमन) निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने पिंपरी-चिंचवडच्या न्यायिक आणि विधी क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. १९९४ मध्ये महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडून वकिलीची सनद मिळाल्यानंतर त्यांनी न्यायालयीन क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. १९९६-९७ मध्ये बार असोसिएशनचे उपाध्यक्षपद आणि २००६-०७ मध्ये अध्यक्षपद भूषविताना त्यांनी वकिलांच्या प्रश्नांना वाचा फोडली. नेतृत्व म्हणजे केवळ खुर्चीवर बसणे नव्हे, तर सहकाऱ्यांच्या अडचणींसाठी पुढे येणे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले.
त्यांच्या कारकिर्दीचा पट केवळ न्यायालयाच्या चार भिंतींपुरता मर्यादित राहिलेला नाही. सन २००५ पासून नोटरी व्यवसायात कार्यरत असताना बँका आणि पतसंस्थांना कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा दिली. बार कौन्सिलच्या निवडणूक समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट सोसायटीचे सचिव, तसेच पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे तज्ज्ञ संचालक सदस्य म्हणून त्यांनी योगदान दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी राजकीय जबाबदारी पार पाडली. कोविडच्या संकटात वकील वर्ग आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात देताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. पिंपरी-चिंचवड न्यायालयीन इमारतीच्या बांधकाम समितीचे सदस्य म्हणून न्यायालयीन पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही त्यांनी प्रयत्न केले. पदे अनेक मिळतात; पण त्या पदांचा उपयोग समाजासाठी किती होतो, यावरच नेतृत्वाची खरी उंची ठरते.
आता शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदाची नवी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. वकिली व्यवसायात शिस्त, व्यावसायिक नीतिमत्ता आणि कायद्याचा सन्मान टिकविण्याच्या दृष्टीने या पदाला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या ३३ वर्षांच्या अनुभवाची, संघटनात्मक कौशल्याची आणि न्यायव्यवस्थेप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवडमधील वकीलवर्गात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. न्यायाच्या मंदिरात अनुभवाची ही नवी जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.