US Report China Pakistan : चीन-पाकिस्तानची हातमिळवणी; भारताला दुहेरी धोका!

Spread the love

Loading

अमेरिकन काँग्रेसच्या २०२६ च्या अहवालात गंभीर इशारा; ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान चीनने थेट युद्धात न उतरता पाकिस्तानला मदत केल्याचे विश्लेषण

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। भारताला रोखायचे असेल, तर स्वतः रणांगणात उतरायची गरज नाही; शेजाऱ्याच्या हातात शस्त्रे द्यायची आणि पडद्यामागून डाव खेळायचा, अशी रणनीती चीन आखत असल्याचे अमेरिकेच्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. अमेरिकन काँग्रेसच्या द्विपक्षीय ‘यूएस-चायना इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशन’ने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सादर केलेल्या वार्षिक अहवालात चीन-पाकिस्तानच्या वाढत्या लष्करी सहकार्यामुळे भारतासमोर दोन आघाड्यांवर संघर्षाचे आव्हान गंभीर होत असल्याचे नमूद केले आहे. अहवालानुसार, भारताची लोकसंख्या, आर्थिक क्षमता, लष्करी सामर्थ्य आणि हिंदी महासागरातील भौगोलिक स्थान चीनच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकते. त्यामुळे बीजिंग भारताच्या वाढीला केवळ स्पर्धा नव्हे, तर सामरिक आव्हान मानत आहे. पाकिस्तान हा चीनचा प्रमुख संरक्षण भागीदार असून २०२० ते २०२४ या काळात पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र आयातीपैकी तब्बल ८१ टक्के पुरवठा चीनकडून झाला, असे अहवालात म्हटले आहे.

मे २०२५ मधील ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान या भागीदारीचे परिणाम दिसल्याचे आयोगाचे विश्लेषण आहे. पाकिस्तानने चीनकडून खरेदी केलेली आधुनिक शस्त्रास्त्रे वापरल्याचे अहवालात नमूद आहे. भारताच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर, सरकारी माहिती-तंत्रज्ञान यंत्रणेवर, दूरसंचार आणि डिजिटल सेवांवर सायबर हल्ल्यांचे प्रयत्न झाल्याचाही उल्लेख आहे. चीनने भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राजवळ प्रगत सेन्सरयुक्त सर्वेक्षण जहाज तैनात करून दबाव वाढवल्याचेही अहवाल सांगतो. संघर्षानंतर पाकिस्तानी लष्कराला चीनकडून रिअल-टाइम उपग्रह छायाचित्रे किंवा गुप्तचर माहिती मिळाल्याचा भारतीय लष्करी अधिकाऱ्यांचा दावा आयोगाने नोंदवला; मात्र चीनने त्याला दुजोरा दिलेला नाही. विशेष म्हणजे, मे २०२६ मध्ये चीनच्या सरकारी ‘सीसीटीव्ही’वर झांग हेंग या ‘एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायना’च्या अभियंत्याने संघर्षादरम्यान पाकिस्तानी भूमीवर चिनी तांत्रिक पथकाने प्रत्यक्ष मदत केल्याचे सांगितल्याचा उल्लेख अहवालात आहे.

भारत-चीन संबंधांतील अविश्वासाचे मूळ २०२० मधील गलवान खोऱ्यातील संघर्षात आहे. ऑक्टोबर २०२४ नंतर दोन्ही देशांनी सीमावरील गस्त व्यवस्थेबाबत करार करून संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले; मात्र सामरिक संशय कायम असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. चीनचे भारताच्या सीमेलगत लष्करी पायाभूत सुविधांचे जाळे, हिंदी महासागरातील नौदलाची वाढती उपस्थिती आणि आर्थिक दबाव हेही चिंतेचे विषय आहेत. भारताला आवश्यक असलेली यंत्रसामग्री, औषधनिर्मितीतील कच्चा माल आणि बॅटरी तंत्रज्ञान यांवर चीनचे अवलंबित्व असल्याने आर्थिक दबावाचे साधनही बीजिंगकडे आहे. भारतातील चीनचे राजदूत श्यू फेइहोंग यांनी चीन-पाकिस्तानचे संरक्षण सहकार्य कोणत्याही तिसऱ्या देशाविरुद्ध नसल्याचे म्हटले होते. मात्र, अहवालाने उपस्थित केलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. दोन आघाड्यांचा धोका हा केवळ युद्धाचा प्रश्न नाही; तो भारताच्या संरक्षण सज्जतेचा, स्वदेशी उत्पादनाचा आणि सामरिक स्वायत्ततेचा कस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *