Pimpri Metro: मेट्रोच्या कामात सुरक्षेचा बोजवारा !

Spread the love

Loading

निगडी-पिंपरी मार्गावर कामगारांसह नागरिकांचाही जीव धोक्यात; क्रेन, उघड्या सळ्या, मोडकळीस आलेले बॅरिकेडिंग आणि रस्त्यावर सांडणाऱ्या पाण्यामुळे अपघाताचा धोका

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। मेट्रोचे जाळे विस्तारण्याच्या नावाखाली विकासाचा डंका वाजवला जात असताना निगडी-पिंपरी मार्गावर मात्र सुरक्षिततेचा पाया किती कमकुवत आहे, याचे दर्शन घडत आहे. उंचावर काम करणारे कर्मचारी हेल्मेटविना, क्रेनखाली नागरिकांची वर्दळ, रस्त्यालगत उघड्या सळ्या, वाकलेले पत्रे, तुटलेली चेंबर्स आणि महामार्गावर सांडणारे पाणी… अशा धोक्यांच्या मालिकेतून नागरिकांना रोजचा प्रवास करावा लागत आहे. निगडीत वाऱ्यामुळे मेट्रोच्या कामावरील पत्रे उडून दुचाकीस्वाराच्या अगदी जवळ कोसळल्याची घटना यापूर्वी घडली होती. मे २०२६ मधील या घटनेनंतर चौकशी आणि सुरक्षा तपासणीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजही मार्गावरील परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित होत असतील, तर त्या तपासणीचा परिणाम नेमका कुठे दिसतो, असा सवाल नागरिकांना पडणे स्वाभाविक आहे.

मेट्रोच्या पुलावर अनेक फूट उंचीवर काही कर्मचारी आवश्यक सुरक्षा साधनांशिवाय काम करताना दिसतात. हायड्रॉलिक क्रेन आणि अवजड यंत्रांच्या खालीच नागरिकांची ये-जा सुरू असते. सूचना फलक, रिफ्लेक्टर आणि सुरक्षित अंतर राखण्याची व्यवस्था अपुरी असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी बॅरिकेडिंगचे पत्रे वाकलेले, उचकटलेले असून त्यांची टोके रस्त्याकडे आलेली आहेत. लोखंडी फ्रेम्स, सळ्या आणि सांगाडे रस्त्यालगत अस्ताव्यस्त पडलेले आहेत. सर्व्हिस रोडवरील स्टॉर्म वॉटर चेंबर्सच्या तुटलेल्या जाळ्या पादचारी आणि वाहनचालकांसाठी सापळा ठरू शकतात. स्लॅबवर मारले जाणारे पाणी थेट महामार्गावर पडत असल्याने दुचाकी घसरण्याचा धोका वाढतो. हिरव्या शेडनेटचा वापरही अनेक ठिकाणी केवळ औपचारिक असल्याचे दिसते. पुणे मेट्रोच्या अधिकृत सुरक्षा आराखड्यात बांधकामामुळे कामगारांचे जीवित धोक्यात येऊ नये आणि वाहतुकीशी संघर्ष टाळण्यासाठी योग्य नियोजन असावे, असे स्पष्ट नमूद आहे.

या आरोपांबाबत पुणे मेट्रोचे चीफ सेफ्टी एक्स्पर्ट हेमंतकुमार ढवळे यांनी काम सुरू होण्यापूर्वी दररोज दहा मिनिटांचे ‘टूल बॉक्स टॉक’ घेतले जात असल्याचे सांगितले. प्रत्येक विभाग आणि स्थानकासाठी सुरक्षा व्यवस्थापक नेमले असून, हेल्मेट किंवा अन्य साधनांचा वापर न करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सुरक्षा व्यवस्थेची पुन्हा तपासणी करून सूचना देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मेट्रो देखरेख विभागाचे संदीप बोले यांनी कामगारांना सुरक्षा साधने वापरण्यास भाग पाडले जाईल आणि सुपरवायझरना स्पष्ट निर्देश दिले जातील, असे सांगितले. मात्र, प्रशिक्षण आणि नियुक्त्यांची माहिती कागदावर असण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सुरक्षितता दिसणे महत्त्वाचे आहे. मेट्रोचा वेग वाढवताना नागरिकांच्या जीवाची किंमत कमी होता कामा नये. अपघातानंतर चौकशी करण्यापेक्षा अपघात होऊच नये, अशी व्यवस्था उभी करणे हीच खरी जबाबदारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *