खासदार रामराव वडकुते यांना श्रद्धांजली

Spread the love

Loading

अहिल्यादेवी होळकर स्मारकात साप्ताहिक पूजेनंतर कार्याचा गौरव; धनगर समाजाच्या ज्येष्ठ नेत्याच्या निधनाने हळहळ

महाराष्ट्र 24:  पिंपरी : मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकात दर रविवारी सुरू असलेल्या अखंडित साप्ताहिक पूजेच्या परंपरेत यंदा धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधान परिषद सदस्य खासदार कै. डॉ. रामराव वडकुते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्मारक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या पूजेचे विधिवत आयोजन श्री. सुहास सामसे यांच्या हस्ते करण्यात आले. महापुरुषांच्या स्मृती जपण्याबरोबरच समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या नेतृत्वाच्या कार्याची आठवण ठेवणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पूजेनंतर उपस्थितांनी कै. डॉ. रामराव वडकुते यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाचे स्मरण केले.

यावेळी श्री. दीपक भोजने यांनी वडकुते यांच्या कार्याचा आढावा घेतला. उच्चशिक्षित असलेल्या वडकुते यांनी धनगर समाजाच्या प्रश्नांना केवळ व्यासपीठावरून वाचा फोडली नाही, तर विधान परिषदेतही सातत्याने मांडणी केली. शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. समाजाच्या हक्कांसाठी झालेल्या विविध आंदोलनांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. समाजातील प्रश्नांची जाण, अभ्यासपूर्ण मांडणी आणि संघर्षाची तयारी ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये होती. राजकीय पदे ही केवळ प्रतिष्ठेची बिरुदावली नसून समाजाच्या प्रश्नांसाठी वापरायची जबाबदारी असते, याची जाणीव त्यांच्या कार्यातून दिसून येत होती, असे भोजने यांनी सांगितले.

स्मारक जयंती उत्सव समिती आणि पिंपरी-चिंचवड शहर धनगर समाजाच्या वतीने कै. डॉ. रामराव वडकुते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सुहास सामसे, सुधाकर अर्जुन, शिवानंद अर्जुन, दीपक भोजने, निखिल पिसे, सुभाष हाके, मनोहर सुरवसे, संभाजी लासके यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. दर रविवारी होणारी ही साप्ताहिक पूजा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहता समाजातील ऐक्य, महापुरुषांचे स्मरण आणि सामाजिक योगदानाचा गौरव करणारे व्यासपीठ ठरत आहे. वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाच्या चळवळीतील एका अनुभवी नेतृत्वाची उणीव निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *