ऑनलाईन शिक्षण असतानाही संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नसावी ; कठोर कार्यवाही करून शाळांवर गुन्हे दाखल करा: बच्चू कडू

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – पुणे – दि. १८ ऑक्टो – शाळा व्यवस्थापन नियमबाह्य आणि वाढीव शालेय शिक्षण शुल्क पालकांकडून आकारत असल्याचे आढळून आल्यास संबंधित दोषी शाळा व्यवस्थापनावर कठोर कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल करा, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण विभागाला दिले.

शाळांच्या शुल्काबाबत समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती त्याबाबतचा अहवाल देईल. समितीचा अहवाल येताच त्यानुसार कार्यवाही केली जाईल. यात शिक्षण विभागाचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात शालेय वर्ग बंद असताना ई-शिक्षण वर्ग सुरु आहेत. त्यामुळे यावर्षीचे शालेय शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी पालकांनी मागणी लावून धरली.

काही शाळांमध्ये नियमित अभ्यासक्रमापेक्षा वेगळा अभ्यासक्रम शिकवला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची तपासणी करण्यात यावी. तसेच अतिरिक्त शुल्क आकारण्याचा अधिकार नसताना इतर शुल्काच्या नावाखाली पालकांकडून मनमानी शुल्क आकारणी करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी. जबरदस्तीने पुस्तके, कपडे, दफ्तर घेण्यास भाग पाडणाऱ्या शाळांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे, असे आदेश अधिकाऱ्यांना देतानाच, असे प्रकार शाळा व्यवस्थापनाकडून घडत असल्यास पालकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन कडू यांनी केले.

काही शाळा बोगस पालक-शिक्षक समिती स्थापन करत आहेत. असे प्रकार तपासणीदरम्यान आढळून आल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. तसेच शाळा व्यवस्थापनाने खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्यास फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येतील. थेट शाळेत वर्ग भरत नाहीत त्यामुळे ऑनलाईन शिक्षण असतानाही संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नसावी, असे त्यांनी सांगितले. विलंबशुल्कच्या नावाखाली दरदिवशी १० रुपये आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून ते अयोग्य असल्याचेही कडू यांनी निदर्शनास आणून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *