मेट्रोचे दरवाजे सोमवारपासून अटी व शर्तीवर सर्वांसाठी उघडणार,

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – मुंबई – दि. १८ ऑक्टो -घाटकोपर ते वर्सोवा मार्गावरील मेट्रो सेवा सोमवार 19 ऑक्टोबर सकाळी 8.30 पासून काही अटी व शर्ती पाळून सुरू करण्यात येत असून मेट्रोमध्ये सर्वसामान्य प्रवासीही प्रवास करू शकणार आहेत. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱयांच्या सुरक्षेसाठी कोविड-19 संदर्भातील नव्या ‘एसओपी’ जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात प्रत्येक प्रवाशांचे तापमान प्रवेशद्वारावर तपासण्यात येणार आहे. मास्क परिधान करणे तर बंधनकारक असणारच आहे, प्रवाशांना मेट्रोत एक आसन सोडून बसावे लागणार आहे. तसेच एका ट्रेनमध्ये साधारण तीनशे प्रवाशांना प्रवेश असणार आहे. दिवसातील फेऱया निम्यावर आणण्यात आल्या असून केवळ 200 फेऱया चालविण्यात येणार आहेत.

मुंबई मेट्रो वनला सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर मेट्रोच्या सुरक्षा तपासण्या आणि चाचण्या घेण्यात आल्या असून ती सोमवारपासून प्रवाशांच्य सेवेसाठी सज्ज झाली आहे. तर मोनोरेल तर तिच्या आधीच रविवारपासून सुरू होत आहे. मेट्रोच्या संपूर्ण स्टाफला प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना आवश्यक ती सुरक्षा साधने पुरविण्यात आली आहेत. प्रवाशांना मास्क परिधान करणे आणि सॅनिटायझर बॉटल जवळ बाळगणे तसेच आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वेमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच प्रवेश असला तरी मेट्रोमध्ये आजारी नसलेला म्हणजेच लक्षणे नसलेला कोणीही सर्वसामान्य प्रवासी प्रवास करू शकणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *