कोरोना इम्पॅक्ट ; मुंबई, पुण्यातील ५६ टक्के तयार घरांना ग्राहकांची प्रतीक्षा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – मुंबई – दि. १९ ऑक्टो -जुलै ते ऑगस्ट या तिमाहीत घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढू लागले असले तरी आजही देशातील सात प्रमुख शहरांमध्ये तब्बल ७ लाख २३ हजार तयार घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे यापैकी ५६ टक्के म्हणजेच ४ लाखांपेक्षा जास्त घरे ही मुंबई महानगर आणि पुण्यातील आहेत.

जून महिन्याच्या अखेरीस मुंबई, पुण्यात बांधकाम पूर्ण झालेली आणि वापर परवाना मिळालेली अनुक्रमे २,७६,४९२ आणि १,३५,१२४ अशी ४ लाख ११,६१६ घरे विक्रीसाठी तयार होती. त्यानंतरच्या तीन महिन्यांत विक्रीच्या तुलनेत नव्या घरांची संख्या कमी होती. त्यामुळे विक्रीच्या प्रतीक्षेतील घरांची संख्या ४,०४,८८० इतकी कमी झाली. दिल्लीत १५ टक्के म्हणजेच १ लाख ८ हजार आणि बंगळुरू येथील सुमारे ७२ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध असून या घरांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर, जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात एप्रिल ते जून या तिमाहीत या सात शहरांमघ्ये जेमतेम ५,३८२ घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ती संख्या ८५ टक्क्यांनी वाढून ३५,१३२ पर्यंत पोहोचली. त्यात सर्वाधिक वाटा सप्टेंबरमधील खरेदीचा आहे.

सप्टेंबर, २०१९ मध्ये विक्रीच्या प्रतीक्षेतील घरांची संख्या यंदाच्या तुलनेत कमी होती. घरांच्या विक्रीची जी गती त्या वेळी होती त्यानुसार शिल्लक घरांच्या विक्रीसाठी सुमारे २३ महिने लागतील असा अंदाज होता. मात्र, यंदा घरांच्या संख्येतही वाढ झाली असून त्यांच्या विक्रीची गतीही मंदावली. त्यामुळे या ७ लाख घरांच्या विक्रीसाठी किमान ४३ महिने लागतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्जांनी वर्तवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *