महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ ऑक्टो -गेल्या सात महिन्यांपासून लोकलमधून प्रवास करायला मिळण्यासाठी डोळे लावून बसलेल्या चाकरमान्यांना दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने गोड बातमी दिली आहे. लोकलची दारे सर्वसामान्यांना खुली करण्यासाठी राज्य सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे. यात विविध अटी आणि शर्तींवर दिवसाच्या पाच वेगवेगळय़ा वेळांमध्ये ठराविक वर्गवारीतील प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. त्याचा अभ्यास करून रेल्वे राज्य सरकारला आपल्या तयारीची माहिती देणार आहे. त्यानंतरच लोकल सर्वसामान्यांना खुली करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
सध्या मध्य रेल्वेवर दररोज 706 फेऱ्या तर पश्चिम रेल्वेवर 704 फेऱया चालविण्यात येत आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर 4 लाख 52 हजार 340 प्रवासी तर मध्य रेल्वेवर साधारण तीन लाख प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत.
राज्य सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे. या पत्रात कोविड-19 प्रोटोकॉल पाळून लोकल सेवा सर्वसामान्यांना सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर आता रेल्वेकडून फेऱ्या वाढविण्यासह इतर कोविड-19 प्रोटोकॉल पाळण्यासंदर्भात तयारी करण्यात येणार असून लवकरच लोकलचा प्रवास सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
