महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २ नोव्हेंबर : मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे राज्यातील अकरावीचे प्रवेश रखडले आहेत. अकरावीची पहिली यादी जाहीर झाली. मात्र, दुसर्या यादीला स्थगिती देण्यात आली. ही प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होईल याची निश्चिती नसल्याने शालेय शिक्षण विभागाने सोमवार (दि. २) पासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
१ आणि २ नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास सांगण्यात आले होते. रविवारी सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तिन्ही शाखांसाठी हे वर्ग सुरू होणार आहेत. सुरुवातीच्या दोन दिवसांचे वेळापत्रकही विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले आहे. जोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत हे ऑनलाईन वर्ग सुरू राहतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली.
या ऑनलाईन वर्गांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. यूट्यूबवरून हे वर्ग घेण्यात येणार आहेत. सर्वसाधारणपणे दरवर्षी ऑगस्टमध्ये अकरावीचे वर्ग सुरू होतात. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. ३० ऑगस्टला पहिली प्रवेश यादी जाहीर झाली होती.
