आठ महिन्यांपासून बंद मंदिरांची कवाडे दिवाळीनंतर उघडणार; फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन ;मुख्यमंत्र्यांचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ९ नोव्हेंबर – मुंबई – कोरोनामुळे आठ महिने बंद असलेली धार्मिक स्थळे उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सूतोवाच केले. दिवाळीनंतर हिवाळा असल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती अाहे. त्यामुळे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा, असे आवाहन करून दिवाळीनंतर मंदिरे-प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत नियमावली तयार करून निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी रविवारी दुपारी समाजमाध्यमांवर जनतेशी संवाद साधला. या वेळी त्यांनी उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक, मराठा-धनगर आरक्षण याविषयी भाष्य केले.तसेच कारशेडवरून भाजपलाही टोलवले. कोरोनाची दुसरी लाट सुनामी असू शकते. आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल. दिवाळी प्रदूषण आणि गर्दी टाळून साधेपणाने साजरी करा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, राज्यात कापूस खरेदी केंद्रे सुरू झाल्याचे सांगून उडीद, मूग यासारख्या इतर शेतपिकांची शासन खरेदी करणार असून येत्या महिनाभरात ही केंद्रे सुरू करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.

मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी थांबवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केले. आरे कारशेडप्रकरणी होणाऱ्या टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ, असे ते म्हणाले. मुंबईकरांच्या हितासाठी सुविधांची उभारणी करताना त्यात कुणीही मिठाचा खडा टाकू नये असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

कोरोना काळात महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. पहिल्या टप्प्यात १७ हजार, तर दुसऱ्या टप्प्यात ३५ हजार कोटी रुपये अशी एकूण ५२ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात ४१ लाख हेक्टरचे अतिवृष्टीने नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना १० हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *