महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ९ नोव्हेंबर – मुंबई : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धूळ चारत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बायडन यांनी ट्रम्प यांचा पराभव केला केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण जगातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अगदी अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, सध्या उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या कमला हॅरिस, यांच्यापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी बायडन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अमेरिकेत नवे पर्व सुरु : हिलरी क्लिंटन
मतदार व्यक्त झाले आहेत त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरीस यांची निवड केली आहे. अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प यांना नाकारलंय. या निकालाने अमेरिकेच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे. हे ज्यांनी घडवलं त्या प्रत्येकाचे आभार, असं हिलरी क्लिंटन म्हणाल्या.
आपण अमेरिकेला वेगळ्या उंचीवर घेऊन जाल : राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जो बायडन यांचं ट्विट करुन अभिनंदन केलं. जो बायडन आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आपण अमेरिकेल्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाल, अशा शब्दात राहुल गांधी यांनी जो यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दिमाखदार विजयाबद्दल बायडन यांचे अभिनंदन : शरद पवार
जो बायडन आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. तसंच त्यांनी उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या कमला हॅरिस यांचंही अभिनंदन केलं आहे.
जो बायडन आपलं अभिनंदन : सुप्रिया सुळे
राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल जो बायडन आपलं अभिनंदन तसंच उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरिस यांची निवड झाल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन… वय जास्त असलं म्हणून काय झालं, लोकांसाठी काम करण्याची ऊर्जा तरुणांनाही मागे टाकणारी आहे. म्हणूनच ते नेहमी विजयी ठरतात. त्यांचा आपल्या मूल्यांवर ठाम विश्वास असतो व ते त्यासाठी संघर्ष करतात. हे आपण महाराष्ट्रात घडताना पाहिलं आणि आता अमेरिकेतही घडलं, अशी बोलकी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.