महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. १२ नोव्हेंबर – पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. दरम्यान, इच्छुक फॉर्म भरण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आला नसताना कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी आपला पदवीधर मतदारसंघासाठी आज (दि.११) अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थीत होते.
यावेळी भैय्या माने म्हणाले की, आमचे नेते शरद पवार हे उमेदवारी देतील अशी मला खात्री वाटते. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पदवीधरांचे मतदान आहे. यामुळे आम्ही पदवीधर मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून संधी मिळावी. राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. परंतु आम्हाला खात्री आहे की राष्ट्रवादीतून मला संधी मिळेल.
दरम्यान, भैय्या माने यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह, पुण्यातील काही उमेदवारी राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याने त्यांना उमेदवारी मिळणार की नाही हा मुद्दा उपस्थित होत आहे. याचबरोबर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यात राष्ट्रवादी, शिवसेना, आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आहे. जागावाटपाचा निर्णय होण्याआधी भैय्या माने यांनी अर्ज दाखल केल्याने इच्छुकांचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष व राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे श्रीमंत कोकाटे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली आहे. मला विश्वास आहे की उमेदवारी मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.