शिर्डीतील साई मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १६ नोव्हेंबर – साईसमाधी मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर सोमवारी भल्या पहाटे दर्शनासाठी खुले झाले. भाविकांना साईदर्शनाची, तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना भाविकांच्या गर्दीची आस लागली होती. नगरपंचायतीने विद्युत रोषणाई करून आणि ग्रामस्थांनी रांगोळ्या रेखाटून भाविकांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिर उघडण्याचे जाहीर केल्यापासून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यापार्श्वभूमीवर व्यवस्थापनाकडूनही तयारी करण्यात आली होती.

शिर्डीत येण्यासाठी नगर-कोपरगाव रस्त्याशिवाय पर्याय नाही. पाया खचल्याने हा रस्ता ठिकठिकाणी नष्ट झाला. त्यावर मुरूम टाकला. जड वाहनांनी त्याची भुकटी केली. आता त्यावरून वाहन गेले की धुळीचे लोट उठतात. देश-विदेशातील भाविकांना धूळस्नान करतात. आणखी दोन-अडीच महिने हीच परिस्थिती राहील. बांधकाम विभागाचे स्वागतफलकही धुळीत न्हाऊन निघत आहेत.

रस्त्यावरून चोवीस तास धुळीचे फवारे उडत असतानाही मोठी गैरसोय सोसून वाहतूक पोलिस वाहने अडवून कागदपत्रे तपासतात. आता भाविकांच्या वाहनांची त्यात भर पडेल. काम दुप्पट वाढेल. या जादा कामाचा बोजा सोसण्यास ते आनंदाने तयार झाले आहेत. त्यांनी नगर ते कोपरगाव या अंतरात किमान तीन ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. नाशिक पोलिसांनी गुजरात व मुंबई येथून येणाऱ्या भाविकांसाठी नेहमीची सेवा द्यायचे ठरविले आहे. भाविकांच्या स्वागतासाठी अशी सगळ्यांचीच “जय्यत तयारी’ झाली आहे.

नगरपंचायतीला वाहनतळांची सुलभ व्यवस्था आजवर करता आली नाही, तरी रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांना भाडे आकारले जायचे. ही पद्धत लगेच सुरू करण्याबाबत निर्णय झालेला नाही. भविष्यात आरामबस सुरू झाल्या आणि वाहतुकीचा खोळंबा झाला, तर साईसंस्थानने दिलेल्या क्रेनने भाविकांची छोटी वाहने ओढून न्यायची. आरामबसकडे कानाडोळा करायचा, ही पद्धत पोलिस सुरू ठेवणार का, हेही ठरलेले नाही. तूर्त विद्युत रोषणाई करून नगरपंचायतीने भाविकांचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *