राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून सुरू करण्याची तयारी ; स्थानिक प्रशासनाला सूचना

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ नोव्हेंबर – पुणे- राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून सुरू करण्याची तयारी सध्या सुरू आहे. शाळा सुरू करण्यापूर्वीची तयारी म्हणून शालेय शिक्षण विभागाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या संदर्भात स्थानिक प्रशासनाला सूचनाही देण्यात येत आहेत.

राज्यातील शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या असून त्यानुसार स्थानिक महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने व्यवस्था करावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिल्या आहेत.

शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने काढलेले परिपत्रक आणि मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक प्रशासनाने शाळा, शिक्षक यांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालये यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. शाळांना सँनिटायझर, थर्मल गन, ऑक्सीमीटर अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावे. तसेच येत्या रविवारपर्यंत (ता.२२) संबंधित शिक्षकांना शासकीय केंद्रात कोविड-१९ साठी आरटीपीसीआर टेस्टिंग मोफत वैद्यकिय तपासणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, असे कृष्णा यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *