सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा ; भाजीपाल्याचे दर आले निम्म्यावर

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २१ नोव्हेंबर – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक प्रचंड वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर निम्म्यावर आले आहेत. कोथिंबीर, कोबी, फ्लॉवरसह सर्व भाज्यांचे दर नियंत्रणात आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

बाजार समितीमध्ये प्रतिदिन ४५० ते ५०० वाहनांची आवक होत असते. शुक्रवारी तब्बल ५६० वाहनांची आवक झाली. मागणीच्या तुलनेमध्ये आवक जास्त असल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. दुधी भोपळा २० ते २८ रुपये किलोवरून ८ ते १२ रुपये झाले आहेत. कोबी २८ ते ३८ वरून १४ ते २०, फ्लॉवर २० ते २६ रुपयांवरून १० ते २० रुपये किलोवर आला आहे. फरसबी, गवार व वांगे यांच्या दरामध्येही मोठी घसरण झाली आहे. बाजारभाव निम्म्यावर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. एपीएमसीमध्ये कोथिंबिरीची मोठी जुडी १५ ते ४० वरून १० ते १५ रुपयांवर आली असून किरकोळ मार्केटमध्ये छोट्या जुड्या करून ५ रुपयांना विकल्या जात आहेत. मुंबईमध्ये पुणे, नाशिक, सातारा व काही प्रमाणात इतर राज्यांतूनही भाजीपाल्याची आवक होत आहे. बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, आवक अचानक वाढल्यामुळे दर कमी झाले आहेत. पुढील आठवडाभर भाजीपाला स्वस्तातच भेटण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

कोथिंबिर उत्पादकांचे हाल
कोथिंबिरीचे दर राज्यात सर्वत्र घसरले आहेत. पुणे बाजार समितीमध्ये शुक्रवारी विक्रमी ७९ हजार जुड्यांची आवक झाली असून १ ते ३ रुपये जुडी दराने विक्री झाली आहे. पंढरपूर बाजार समितीमध्ये १ ते ५ रुपये व मंगळवेढा बाजार समितीमध्ये १ ते ३ रुपये जुडी दराने कोथिंबिरीची विक्री झाली. अकलूज, श्रीरामपूर, रत्नागिरी बाजार समितीमध्ये कोथिंबीर २ रुपये जुडी दराने विकली गेली.सणासुदीच्या काळात भाज्यांचे भाव प्रचंड वाढले होते. काही भाज्या किरकोळ बाजारात १५० रुपये किलोच्या भावातही विकल्या गेल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *