पदवीधरसाठी दिग्गज नेते मैदानात; पुण्यात चंद्रकांत पाटील यांचा प्रचार, जयंत पाटील यांच्यासह चार मंत्री आज सोलापुरात

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ नोव्हेंबर -पुणे, नागपूर, अमरावतीत उमेदवारांची धावाधाव काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली असून भाजपा उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ शनिवारी त्यांनी कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला, रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापुरात प्रचारास येणार आहेत.

येत्या १ डिसेंबर रोजी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी प्रचारासाठी झंझावाती दौरे करून मतदारांना मतदानासाठी आवाहन केले.शनिवारी त्यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात संपर्क अभियानावर भर दिला.

कोथरूड मधील प्रभाग ३१, प्रभाग १३ आणि प्रभाग १० मधील रहिवासी भागातील ५० कुटुंबांना नागरिकांशी संवाद साधला. तसेच ५० मतदारांच्या घरी जाऊन, भाजपा उमेदवार संग्राम देशमुख यांचा मतदारांना परिचय होण्यासाठी पदवीधर विकासचा अंक देऊन, १ डिसेंबर रोजी भाजपा उमेदवार संग्राम देशमुख यांना मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन केले. दरम्यान, महाविकास आघाडीचे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड व शिक्षकचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उदय सामंत, सतेज उर्फ बंटी पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम हे रविवारी सोलापुरात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *