महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ नोव्हेंबर – पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली गोव्याची ओळख कोळशामुळे पुसू देऊ नका, कोळशास जीव तोडून विरोध करा, आम्ही तुमच्यासोबत राहू, असे स्पष्ट आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा गोव्याचे प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी दिले.
पर्यटन उद्योगाद्वारेच गोव्याला नव्या भारताचा आधुनिक चेहरा बनवुया, असेही ते म्हणाले. कोरोना महामारीनंतर गोव्याच्या राजकीय पटलावर निधर्मी सरकार स्थापन होईल व एक नवी सुरुवात होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त
केली.
पणजीत आझाद मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित असलेल्या या सभेच्या व्यासपीठावर पक्षाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, आमदार चर्चिल आलेमाव, निरीक्षक नरेंद्र वर्मा, सतीश नरियानी, संजय बर्डे, सेंड्रा मार्टिनी, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित
होते.
कोळशामुळे पर्यावरण नष्ट होईल
पर्यटन हा गोव्याचा आर्थिक कणा असून त्यात कोळशाची भर पडल्यास गोव्याचे पर्यावरण नष्ट होईल. पर्यटन नसेल तर गोव्याची अर्थव्यवस्था कोसळेल. एकेकाळी खाणी हा गोव्याचा आर्थिक कणा होता. त्या बंद पडल्यानंतर सारी भिस्त पर्यटनावर आली. परंतु कोरोनामुळे तोही बंद पडला.
आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊन पर्यटन उद्योग जरासा कुठे स्थिरस्थावर होऊ लागला असतानाच कोळशाचे भूत गोमंतकीयांच्या मानगुटीवर बसविण्याचे षड्यंत्र भाजप सरकारने आखले आहे.
गोव्याला कोळसा हब बनविण्याच्या या प्रयत्नांना सर्व थरातून विरोध होत असतानाही सरकार हट्टाला पेटले आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता गोमंतकीयांच्या सोबत राहणार आहे, असे आश्वासन पटेल यांनी दिले.
