महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ नोव्हेंबर – लॉकडाउनपश्चात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला आजपासून सुरुवात होत असून सिडनीच्या मैदानावर दोन्ही संघ पहिल्या वन-डे सामन्यासाठी समोरासमोर येत आहेत. फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंड दौरा आटोपून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय मालिका खेळलेली नाही. आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्व भारतीय खेळाडू व्यस्त असल्यामुळे वेळापत्रकातही बदल करण्यात आला. त्यामुळे पहिलाच सामना ऑस्ट्रेलियासारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यासोबत असल्यामुळे विराटसेनेसमोर मोठं आव्हान असणार आहे.
टीम इंडिया सध्या दुखापतींशी झुंज देते आहे. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंग इंज्युरीमुळे वन-डे आणि टी-२० संघात स्थान मिळालेलं नाही. कसोटी संघात रोहित खेळेल की नाही याबद्दलही साशंकता आहे. त्यात भर म्हणून पहिल्या सामन्याआधी युवा गोलंदाज नवदीप सैनीच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे निवड समितीने टी. नटराजनला भारतीय संघात स्थान दिलं आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघातील युवा खेळाडूंसमोर स्वतःला मिळालेल्या संधीचं सोनं करत आपलं स्थान निश्चीत करण्याची चांगली संधी आहे. विराट कोहलीच्या साथीला यंदा लोकेश राहुल हा उप-कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.