महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ नोव्हेंबर – ‘त्यांनी मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने 3 जण तरी मारले असते’, अशी प्रतिक्रिया शहीद जवान यश देशमुखचे वडील दिगंबर देशमुख यांनी दिली आहे. जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हा जवान शहीद झाला आहे. आज या वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
यशचे वडील दिगंबर देशमुख यांनी सांगितलं की, यश सप्टेंबर महिन्यात घरी आला होता. 2 ऑक्टोबरला परत गेला. 4 दिवसांपूर्वी फोनवर बोलणं झालं होतं, कसे आहात विचारलं होतं. गुरुवारी दुपारी मला लष्करी अधिकाऱ्यांचा फोन आला. तो खूप जिद्दी होता, परिस्थितीची त्याला जाणीव होती, असं त्यांनी सांगितलं.
शहीद जवान यश देशमुख यांचे पार्थिव थोड्याच वेळात त्यांच्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथे पोहोचणार आहे. दरम्यान गावी जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी फलक लावत यशला श्रद्धांजली अर्पण केली जात असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत.
यश देशमुख गेल्या वर्षी मिल्ट्रीमध्ये भरती झाला होता. गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीरमध्ये त्याची नेमणूक करण्यात आली होती. शेतकरी कुटुंबातील असलेल्या यशच्या शहीद होण्याने त्याच्या पिंपळगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे.
श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर तीन दहशतवाद्यांनी अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले होते.
या हल्ल्याविषयी माहिती देताना पोलीस महानिरिक्षक म्हणाले होते की, हल्लेखोर मारुती कारमध्ये आले होते. त्यांनी अचानक जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता आहे. शोधमोहिम सुरू असून संध्याकाळपर्यंत या विषयी अधिक माहिती मिळेल. या हल्ल्यात आपले दोन जवान शहीद झाले आहेत.