महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ नोव्हेंबर – २०२० मध्ये काेराेना महामारी नसती तर कदाचित वृत्तपत्रांच्या मथळ्यांत नैसर्गिक प्रकाेपाच्या घटनांना स्थान मिळाले असते. अमेरिका-आॅस्ट्रेलियातल्या जंगलांत पेटलेला वणवा, सरासरी तपमानात सातत्याने वाढ हाेऊन रशियातील पर्माफ्राॅस्टचे वितळणे तसेच आशिया-पॅसिफिक बेटांवरच्या अनेक भागातील अतिवृष्टी, पूर किंवा वादळ.. ही सर्वच नैसर्गिक प्रकोपाची उदाहरणे आहेत.
आंतरराष्ट्रीय हवामानतज्ज्ञांच्या मते, हे वर्ष संपता संपता दक्षिणपूर्व आशिया आणि भारतीय उपखंडाला हवामानाच्या अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागू शकते. हिंद महासागरातील ला निना परिस्थितीमुळे भारतात वादळ-हिवाळा, तर चीनमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. आॅस्ट्रेलिया आणि इंडाेनेशियामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती उद्भवू शकते. टोकियोच्या हवामान संस्था, हवामानतज्ज्ञ व हवामानाशी निगडित आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ मसामी यामदा यांच्या मते, येणाऱ्या महिन्यात दक्षिण आशियामध्ये ला निनामुळे काही अडचणी निर्माण हाेऊ शकतात. त्या म्हणाल्या, या वर्षी उन्हाळ्यात हिंद महासागर डायपोलची घटना घडली. यामध्ये समुद्राच्या पूर्व आणि पश्चिम भागातील तापमानात अचानक बदल हाेताे. त्याला भारतीय निनो असेही म्हणतात. यामुळे समुद्राच्या पश्चिम व उत्तरेकडील भागात उष्णतेमुळे तीव्र पाऊस पडताे. उत्तर भागात तापमान घसरल्याने थंडी वाढते व त्यालाच लागून असलेल्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियामध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण हाेते. याच कारणामुळे या वर्षी चीनच्या यांगत्सी खाेऱ्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली. दक्षिणपूर्व आशियामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी हाेण्याची दाट शक्यता आहे. मध्य व्हिएतनाम, फिलिपाइन्समध्ये आधीच अतिवृष्टी आणि सागरी वादळामुळे खूप नुकसान झाले आहे.