‘टू व्हीलर टॅक्सी’ ही संकल्पना रोजगार निर्मितीची नवीन वाट ठरेल : नितीन गडकरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ नोव्हेंबर – कोरोनामुळे सर्वच औद्योगिक व अन्य क्षेत्रांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. अशा स्थितीतही ऑटोमोबाइल क्षेत्राने मात्र चांगली कामगिरी केली ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात ‘टू व्हीलर टॅक्सी’ ही संकल्पना रोजगार निर्मितीची नवीन वाट ठरेल, असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

एफएडीए गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गडकरी यांनी संवाद साधला. टू व्हीलर टॅक्सीला इलेक्ट्रॉनिक मीटर लावून टॅक्सी म्हणून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे कुणालाही पैसा कमावता येणार आहे. एकट्या व्यक्तीला बस, रेल्वेस्टेशनवर पोहोचायचे असल्यास ही टॅक्सी सुविधा अत्यंत फायदेशीर ठरेल. टॅक्सीचालकाला रोजगार आणि प्रवाशाला स्वस्तात आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचता येणार आहे.

आपल्या देशात सार्वजनिक वाहतूक अपेक्षेइतकी यशस्वी झाली नाही. काही भागात यशस्वी झाली आहे. पण ती डिझेलमुळे परवडत नाही. सार्वजनिक वाहतुकीसाठी जैविक इंधन- इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजी, बायो सीएनजीचा वापरच अधिक फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय ट्रॉली बसेसचा वापर केला तर कमी खर्चात प्रवास शक्य आहे. इलेक्ट्रिक इंधन हे अत्यंत स्वस्त पडणारे इंधन आहे. डिझेल आणि पेट्रोलसाठी आज जैविक इंधनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. जवळपासच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी गडकरी यांनी ब्रॉडगेज मेट्रोचा पर्याय समोर ठेवला. हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे. केवळ ५ कोटी रुपये प्रतिकिलोमीटर खर्च या प्रकल्पाला येणार आहे. रेल्वेच्याच सुविधा वापरून नागपूर, अमरावती, नरखेड, वडसा, गोंदिया, रामटेक, छिंदवाडा अशा ठिकाणी ब्रॉडगेज मेट्रोतून प्रवास करता येईल. १६० किमी प्रतितास आणि एसीची सुविधा असलेली मेट्रो जनतेला प्रवासासाठी यशस्वी ठरेल. ऑटोमोबाइल क्षेत्राने कोरोनाकाळातही उत्तम कामगिरी केली आहे. असे असले तरी वाहनांचे अनेक सुटे भाग आज आयात करावे लागतात. आयात करण्यात येणाऱ्या साहित्याला पर्याय निर्माण करून ते देशातच तयार झाले पाहिजेत व ही आयात थांबली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *