महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ नोव्हेंबर – गेल्या वर्षभरापासून म्हाडाच्या सदनिकांसाठी सोडतीची वाट पाहणाऱ्या गरीब, मध्यमवर्गीयांसाठी खूषखबर आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरासह जिल्ह्यात ‘म्हाडा’च्या सुमारे पावणेपाच हजार सदनिका उपलब्ध असून, त्यासाठी डिसेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. शिक्षक-पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही सोडत निघण्याची शक्यता आहे. गरीब, मध्यमवर्गीयांसह उच्च उत्पन्न गटातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
‘म्हाडा’च्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून गतवर्षी सप्टेंबरमध्ये सोडत काढण्यात आली होती. परंतु, त्यानंतर एक वर्षाहून अधिक काळ उलटूनही सोडत निघालेली नाही. मार्च-एप्रिलमध्ये सोडत काढण्याची तयारी ‘म्हाडा’ने सुरू केली होती. परंतु, लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सोडतीची प्रक्रिया मागे पडली. लॉकडाउन संपल्यानंतर दिवाळीमध्ये सोडत निघेल, अशी अपेक्षा होती. परंतु शिक्षक-पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यामुळे स्वप्नातील घराची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चाकण परिसरातील म्हाळुंगे-इंगळे येथे अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये दोन हजारांहून अधिक सदनिका उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे पूर्वी ‘म्हाडा’ने जाहीर केलेल्या किमतीपेक्षा २० टक्क्यांहून कमी किमतीत या सदनिका उपलब्ध होणार आहेत. पिंपरी-वाघिरे येथे नऊशे सदनिकांचा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. तसेच, ४५ बिल्डरांकडून उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पांमधील २० टक्के सदनिका म्हणजे सुमारे दीड हजार सदनिका ‘म्हाडा’साठी उपलब्ध झाल्या आहेत. अशा एकूण चार हजार ७२३ सदनिकांसाठी सोडत निघणार आहे.
गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणाऱ्या दरातील सुमारे पावणेपाच हजार सदनिका ‘म्हाडा’कडे उपलब्ध आहेत. म्हाळुंगे, पिंपरी-वाघिरेसह पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात या सदनिका आहेत. सध्या आचारसंहिता सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.
– नितीन माने, मुख्याधिकारी म्हाडा, पुणे