सरकार एक पाऊल मागे, शेतकऱ्यांना ३ डिसेंबरला चर्चेचे निमंत्रण;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ नोव्हेंबर – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विराेधात हजाराे शेतकरी दिल्लीत एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना ३ डिसेंबरला भेटीसाठी बाेलाविण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांनी दिली. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांनी दिल्लीला घेरण्याची तयारी केली आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. एकूण परिस्थिती पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन डिसेंबरपूर्वीही शेतकऱ्यांसाेबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहाेत, असे स्पष्ट केले.

राजधानी दिल्लीमध्ये किसान विरुद्ध जवान असा अभूतपूर्व संघर्ष दिसला हाेता. त्यानंतर शेतकऱ्यांना बुराडी येथील निरंकारी मैदानात शांततेच्या मार्गाने आंदाेलन करण्याची परवानगी देण्यात आली. या संघर्षावरुन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी माेदी सरकारवर निशाणा साधला. जय जवान, जय किसान असा आमचा नारा हाेता. परंतु, आज जवान शेतकऱ्यावर शस्त्र राेखून उभा दिसत आहे, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले.

दिल्लीला घेरण्याची याेजना
निरंकारी मैदानात जाण्याची परवानगी दिल्यानंतरही शेकडाे शेतकरी दिल्लीच्या वेशीवरच ठाण मांडून बसले आहेत. निरंकारी मैदानात पाेहाेचलेले शेतकरी तिथेच राहून आंदाेलन करणार आहेत. तर दिल्लीच्या वेशीवर आलेले शेतकरी शहराला घेराव टाकण्याच्या पावित्र्यात आहेत. शहराची चाेहीकडून काेंडी झाल्यास मागण्या मान्य करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव येऊ शकताे.

लंगर भाेजनाची साेय
या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांसाठी बंगला साहिब गुरुद्वारातर्फे लंगर भाेजनाचे आयाेजन करण्यात आले हाेते. तर दिल्लीतील ‘आप’ सरकारकडूनही व्यवस्था करण्यात आली आहे. काेराेना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ई-रिक्शाच्या माध्यमातून जनजागृतीही करण्यात येत हाेती.

माेबाइल चार्जिंगसाठी पैसे
दिल्लीच्या वेशीवर थांबलेल्या शेतकऱ्यांना माेबाईल चार्जिंगसाठी माेठी अडचण झाली आहे. त्यामुळे जवळपासची दुकाने आणि रहिवाशांना २० ते ३० रुपये देउन माेबाईल चार्जिंग करत आहेत.

खलिस्तानी समर्थकांचा सहभाग?
शेतकऱ्यांच्या आंदाेलनात खलिस्तानी समर्थकांचा सहभाग असल्याचा आरोप हरयाणाचे मुख्यमंत्री मनाेहरलाल खट्टर यांनी केला आहे. या आंदाेलकांकडून जाेरदार नारेबाजी करण्यात येत हाेती. तसे व्हिडीओ रेकाॅर्डिंग असल्याचेही खट्टर म्हणाले.

आठ पक्षांकडून सरकारचा निषेध
केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अश्रुधूर आणि पाण्याचा मारा केला. रस्तेही खाेदून ठेवले. हे एकप्रकारे शेतकऱ्यांविरुद्ध युद्ध असल्याची टीका आठ विराेधी पक्षांनी केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनी संयुक्त निवेदन जारी करुन केंद्र सरकारचा निषेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *