महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ डिसेंबर – कोरोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आल्याने राज्य सरकारने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याला मान्यता दिली. त्यानुसार गेल्या सोमवारपासून राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड वगळता पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण केवळ १७ टक्के शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र आता जिल्ह्यातील ४१.८१ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शाळेमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी दिसते. शाळा सुरू होऊन आठवडयाभरात केवळ ५.६ टक्के विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत.
पुणे जिल्ह्यात एक हजार १४३ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग आहेत. त्यात जवळपास दोन लाख ९५ हजार २९ विद्यार्थी या वर्गात शिक्षण घेत आहेत. एकूण शाळा आणि कनिष्ठ महाविलयांपैकी सध्या ४७८ शाळा/महाविद्यालये सुरू झाली आहेत. तर जवळपास १६ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे.