विशेष लेख :- जय जय महाराष्ट्र माझा !

Loading

प्रिय वाचकहो,
महाराष्ट्र ही संतांची भूमी! या मातीला पराक्रमाचा जसा वारसा तसा वैराग्याचाही गंध आहे. राजांनी तिचा प्रतिपाळ केला, तर संतांनी सांभाळ! कुणी मनगटे घडवली, तर कुणी मनावर संस्कार केले! परिणामी राजकारणाकडे जसा आमचा कल, तशीच आध्यात्माचीही आम्हाला अनिवार ओढ! त्यामुळेच एका हाती तलवार अन् दुसर्‍या हाती टाळ आणि विणा! अशी परस्पर विरोधांची एकजूट म्हणजे आपला महाराष्ट्र! हे आपण जाणून आहातच. सर्व जातीजमातीत, इथे जसे वीर जन्मले, तसेच संतही जन्मले! प्रत्येक संताचे विचार मननीय तथा वंदनिय!
संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि समर्थ रामदास हे मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते आणि महाराष्ट्रधर्माचे संत होत. त्यांच्यामुळे माणसामाणसांत देव पाहण्याची दृष्टी प्रत्येकाला मिळाली. संतानी समाजामध्ये आध्यात्मिक, वैचारिक, सांस्कृतिक समतेची बिजे पेरली. माणूस उभा राहिला तरच देश उभारेल, हे जाणून संतांनी जनजागृतीचे काम केले.
जातींच्या विविधतेतील विचारांची ही एकता, अत्यंत विलोभनीय अन् कुणालाही हेवा वाटावी अशीच आहे. संतांच्या पालख्या वाहताना, विविधता अन् एकतेत जणू चढाओढ लागते, नि विविधता आणि एकतेच्या त्या संगमात, विविधतेचं विसर्जन होऊन, एकतेचं विराट अनं उदात्त दर्शन घडते! ही संतांची किमया आहे!
स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. संयुक्त महाराष्ट्र या चळवीमध्ये 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलीदान दिले. या चळवळीमुळे 1 मे इ. स. 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खान्देश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.
*आपल्या महान अशा राष्ट्रात कुणी लावतो अमृताशी पैजा! तर कुणी उचलतो, वेदांचा अर्थ सांगण्याचा विडा!*
प्रत्येक संप्रदायात इथे, असे किमयागार होऊन गेलेत की, ज्यांनी या मातीचं सोनं केलं. म्हणूनच नवीन विचाराच्या सर्व नद्यांचा उगम आणि संगम महाराष्ट्रात झाला आहे. त्यामुळेच इथे उगवणार्‍या प्रत्येक विचारांचा वेलू गगनावरी गेला आहे. अशा वेलांचा सुंदर विचारमंडप म्हणजे आपले महाराष्ट्र!
कालौघात माणसाने जशी उत्क्रांती केली त्याच गतीने त्याची प्रगती झाली. हल्लीचे युग हे विज्ञानाचे युग. विज्ञानाने अनेक कमालीचे शोध लावले. परिणामी अत्याधुनिक समकालीन जीवनशैलीत प्रत्येक व्यक्तीने स्वतःला अपडेट करणे गरजेचे बनले आहे. तंत्रज्ञानाने अवकाशाला गवसणी घातलेली असताना एकीकडे डिजीटल क्रांती होतेय तर दुसरीकडे मानव मंगळावर जाण्याची उत्तुंग स्वप्ने पाहत आहे.
मात्र समकालीन तंत्रज्ञानाच्या डिजीटल युगात वावरत असताना प्रत्येकाला जितकी सुबत्ता येते तितक्याच गरजाही वाढत आहेत. नेमके हेच हेरून आम्ही ‘डिजीटल युगात’ स्वच्छंदपणे संचार करणार्‍या चिकित्सक कलंदर व्यक्तिींची गरज ओळखली. अन् ‘डिजीटल जगतातील विश्वासार्ह संकेतस्थळ असे ब्रिद घेऊन ‘महाराष्ट्र-24’ या संकेतस्थळा जन्माला घातले.
यामध्ये वाचकांसाठी खास मेजवानी असणार आहे. सामाजिक, राजकीय, मनोरंजन, विविधा, स्पोर्टस् अशा विविध कॅटेगरीमध्ये बातम्यांचा खजाना आम्ही चिकित्सक वाचकांना भेट देणार आहोत. सोबत ईपेपरही असणार आहे. पत्रकारितेचा वसा आणि वारसा जपत डिजीटल युगात इ-क्रांती घडवायला आम्ही सज्ज झालो आहोत. आपल्या सहकार्याची गरज आहे. तुर्तास एवढेच…
*जय, जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा..!*